मुक्तपीठ टीम
गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या परंपरागत बालेकिल्ल्यांपैकी अमेठी मतदारसंघ भाजपने हातातून ओढून घेतला. आता भाजपने काँग्रेसच्या ताब्यातील सोनिया गांधी खासदार असलेल्या रायबरेली हा एकमेव मतदारसंघही ओढून घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यातच रायबरेली काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीतून असंतोष निर्माण होऊ लागल्याने भाजपच्या पथ्यावरच पडण्याची शक्यता आहे.
उत्तरप्रदेशात गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेसचा आलेख हा पडताच आहे. सातत्याने विधानसभा निवडणुका आणि त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा पराभवच होत राहिला आहे. त्यातही २०१९च्या लोकसभा निवडणुकीत तर भाजपनं अमेठी हा गांधी घराण्याच्या परंपरागत मतदारसंघांपैकी एक हातातून ओढून घेतला. राहुल गांधींना केरळातील वायनाडमुळे लोकसभेतील स्थान टिकवता आले आहे. देशाच्या लोकसभेत सर्वाधिक खासदार पाठवणाऱ्या उत्तरप्रदेशात काँग्रेसला रायबरेलीनेच साथ दिली होती. तेथून काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी लोकसभेवर निवडून गेल्या. आता मात्र तेथेही पक्ष अडचणीत येण्यास सुरुवात झाली आहे.
दिवसेंदिवस काँग्रेसची नेते मंडळी पक्ष सोडून जात आहे. काँग्रेसची स्थिती सुधारण्यासाठी सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तरप्रदेशाचा कार्यभार देण्यात आला. प्रियांका सतत त्या राज्यात पक्षाला उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यांचे प्रयत्न सुरु असतानाच काँग्रेसच्या एकमेव बालेकिल्ला असेलेल्या रायबरेलीत बंडखोरी सुरू झाली आहे.
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यूपीच्या रायबरेली मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत. पण आता तेथेच असंतोष भडकू लागला आहे. राजीव गांधी आणि कॉंग्रेसमधील इंदिरा गांधी यांच्या काळापासून जोडलेले नेते बंडखोरी करत आहेत.
उत्तरप्रदेश कॉंग्रेसचे माजी चिटणीस शिवकुमार पांडे हे तसे उघडपणे सांगतात, “निष्ठावंत कॉंग्रेस नेत्यांना डावलले जात आहे. काँग्रेसच्या विचारसरणीच्या असलेल्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. रायबरेलीमधील पक्षाची अवस्था अमेठीसारखी होईल.”
वाईट काळ असूनही गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षासाठी अनेक जण कार्यरत आहेत. मात्र, पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नव्या कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवली जात आहे. जिल्हाध्यक्ष स्वतःच्या चुका आणि कमतरता झाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा पांडे यांचा आरोप आहे.
युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष अनुज कुमार सिंह हेही पांडे यांच्याप्रमाणेच पक्षावर नाराज आहेत. एकूणच प्रियंका गांधी पक्षात संजिवनी देण्याच्या प्रयत्नात असताना हा असंतोष त्यांचा मार्ग सोपा नसल्याचे दाखवून देत आहे. काहींच्या मते अशा असंतोषाला भाजपही फुंकर मारून मोठे करत आहे.