शुध्दोधन कांबळे
अॕमेझाॕन प्राईम वर ‘अनपाॕझड- नया सफर” ही वेबसीरीज नुकतीच रिलीज झाली, यामध्ये कोरोना महामारीच्या काळात मानवी जीवन आणि मानवी संबंध कशाप्रकारे बदलत गेले तसेच लाॕकडाऊनचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम झाला आहे, यावर भाष्य करणाऱ्या कथा दाखविण्यात आल्या आहेत. या वेबसीरीजची शेवटची कथा “वैकूंठ” ही नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केली आहे तसेच याच कथेमध्ये नागराजनी प्रमुख भुमिका देखिल केली आहे. कोरोना महामारीत मृत्युचा तांडव होऊन स्मशान भुमीत मृत्यूदेह जाळण्यासाठी रांगा लागल्या, नदीत प्रेत वाहू लागली. मृत्यूदेहाची झालेली हेळसांड हा खूपच संवेदनाशील विषय अजून कुठेच कसा आला नाही याचे मला आश्चर्य वाटत होते, नागराजने हा गंभीर विषय इतक्या प्रभावी मांडला आहे की, आपण “वैकूंठ” चे कटू सत्य नाकारु शकत नाही. माणूस मेल्यावर वैकूंठाला जातो ही आपली समजूत आहे, मृत्यू नंतर पार पाडले जाणारे विधी आणि मृत व्यक्तीला अंतिम निरोप देण्यासाठी अप्तस्वकीयांची धावपळ ,हे सर्व कोरोना काळात बदलत गेले. कोरोनाने मेलेल्या वडीलाच्या मृतदेहाला अग्नी देताना कोरोना संसर्ग होण्याच्या भीती मुळे मुलगा वडीलाच्या मृतदेहाजवळ जात नव्हता, अंतिम दर्शन घेण्याची ईच्छा होत नव्हती. कित्येक मृतदेह परिवारातील लोकांनी घेतली नाही म्हणून स्मशानभुमीत काम करणाऱ्या माणसांनी मृतदेहांच्या ढिगाला जाळण्याचे काम केले. गोळा झालेली हाड देखील सॕनिटायजर मारुन घेतली गेली, मृतदेह पॕक असल्यामुळे चुकीचे मृत्तदेहाजवळ जाऊन रडणे, असे अनेक वास्तविकता दाखविणारे प्रसंग नागराज मंजुळे यांनी या कथेत टिपले आहेत.
ही कथा स्मशानभुमीत मृतदेह जाळण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीची कहाणी आहे. तो दिवसराञ अॕम्बुलन्समध्ये येणाऱ्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात व्यस्त आहे, त्याचे वडील कोरोना बाधित होऊन दवाखान्यात आहे तसेच त्याचा घरमालक तो जो काम करीत आहे त्यामुळे आणि त्याच्या वडीलाला कोरोना झाल्यामुळे घर खाली करायला सांगतो. त्याला कुठेच राहायला जागा मिळत नसल्यामुळे तो त्याच्या लहान मुलाला घेऊन स्मशानभुमीतच राहायला जातो. तो त्याच्या मुलाला घेऊन स्मशानभुमीत प्रवेश करताना आपल्याला तिथे लिहिलेले एक वाक्य दिसत, “यहा गरीब और अमीर का बिस्तर एक ही है!” स्मशानभुमी ही सर्वांना समानतेच्या पातळीवर आणते, श्रीमंत असो वा गरीब आंतिम झोपण्याची जागा सर्वांची एकच आहे, हे सत्य येथे अधोरेखित केले आहे. वडीलाच्या तब्येतीची कुठलीच माहिती नसल्यामुळे , वडील अॕडमीट असलेल्या हाॕस्पीटलमधून आलेल्या अँब्युलंसमध्ये वडीलांचा मृतदेह तर नाही ना? याची चौकशी करीत असतो. शेवटी एका अँबुलंसचा ड्रायव्हर त्याला शोधत असतो, तेव्हा त्याचा जीव टांगणीला लागतो, त्याच्या वडीलाचा मृतदेह देण्यासाठी अंबुलंसचा ड्रायव्हर त्याला शोधत आहे असे त्याला वाटते पण पुढच्या क्षणात त्याचा मुलगा त्याच्या आजोबाला आनंदाने मिठी मारत असल्याचे पाहून तो आनंदी होतो. शेवटच्या दृश्यामध्ये मृतदेह जाळून जमा झालेली राख शेतातील पिकांवर शिंपडत असल्याचे दाखविण्यात आले आहे, यातून राखेतूनही फिनिक्स पक्षाप्रमाणे उंच उडण्याचे बळ मिळते तसेच मातीतून मातीकडे जाणारा आपला प्रवासच अंतिम सत्य आहे हे देखिल पटते. कवी संदीप खरेच्या शब्दात सांगायचे झाले तर “मातीच बरी, मातीच खरी … मातीत माती मिसळत जगू.”
“वैकूंठ” ही कथा जवळपास ३५ मिनिटांची आहे , यामध्ये संवाद फारच कमी आहेत पण कॕमेराचा प्रत्येक अँगल खूप काही सांगून जातो. नागराज मंजुळे यांच्या चिञपटांचे आणि शाॕर्टफिल्मचे एक वैशिष्टये असते की ते आपल्याला त्यांच्या कॕमे-यातून कथा सांगतात पण त्या कथेतून काय अर्थ घ्यायचा याचे स्वातंत्र्य प्रेक्षकांना देतात. यावेळेस देखील कोरोना काळात मानवी मृतदेहांची झालेली शोकांतिक तटस्थपणे मांडली आणि शेवटच्या दृश्यातून काय अर्थ घ्यायचा हे प्रेक्षकांवर सोडले. माझ्या मत्ते, या कथेतून नागराजने परिस्थितीशी लढण्याचा आणि आपल्याला बळ देण्याचा संदेश दिला, तो जेंव्हा त्याच्या मुलाला घेऊन स्मशानभुमीत राहायला येतो तेंव्हा त्याच्या मुला न घाबरण्याचा सल्ला देतो. हा सल्ला कदाचित प्रेक्षकांना पण असेल कारण तो आणि त्याचा मुलगा आणि वडील या परिस्थितीतही तग धरु शकतात तर आपण का नाही. या शाॕर्ट फिल्म मध्ये हा विषय निवडून नागराज यांनी संवेदनाशील कलाकार असल्याचे पुन्हा एकदा सबूत दिले आहे.
(प्रा. शुध्दोधन कांबळे हे डाॕ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावती येथे इंग्रजीचे सहाय्यक प्राध्यापक आहेत. ते चिञपट समीक्षक असून दलित साहित्यावर त्यांची पी.एच.डी. सुरु आहे. सामाजिक , राजकीय व सांस्कृतिक विषयावर त्यांचे अनेक लेख प्रसिध्द आहेत.)