मुक्तपीठ टीम
मुंबई मनपाच्या निवडणुकीच्या तयारीला राष्ट्रवादी काँग्रेसनेही सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मातेले यांनी नुकतीच “एन” विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय सोनवणे साहेब यांची भेट घेतली. घाटकोपर मधील प्रभाग क्रमांक १२९ मध्ये अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या नागरी समस्याबाबत व येथील माणिकलाल मैदानाचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे करावे याबाबत त्यांनी निवेदन देऊन चर्चा केली. या भागांची लोकसंख्या ५० हजाराच्या आसपास आहे. हा भाग डोंगरमाथ्यावरील टेकडीवर वसलेला असल्याने येथे पुरेशा नागरी सुविधा अजूनही पोहचलेल्या नाहीत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अॅडवोकेट अमोल मातेले यांनी स्वतः या भागाचा दौरा करून या समस्या समजून घेतल्या होत्या.
अमोल मातेले यांनी मनपाकडे केलेल्या मागण्या
- येथील हनुमान टेकडी, गफूर शेख चाळ, खडी मशीन हिल नं -४, मथुरामबाबा मंदिराजवळ, आझादनगर, घाटकोपर (प), मुंबई हा संपूर्ण परिसर उंच टेकडीवर वसलेला असून येथे ५०००० पेक्षा जास्त लोकवस्ती आहे. ह्या भागात पाणी मर्यादित कालावधीकरिता कमी दाबाने येत असल्याने सर्वच लोकांची पाण्याची निकड पूर्ण होत नाही. तसेच कमी दाबामुळे डोंगरमाथ्यावर लोकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांचे विशेषतः महिला भगिनींना प्रचंड कष्ट व हाल सोसावे लागतात. यासाठी घरोघरी नळजोडणी करून उच्च दाबाने पाणी पुरवठा करणे,
- हनुमान टेकडी मस्तरामबाबा चौकातील गटार सफाई अभावी तुंबून त्यातील सांडपाणी रस्त्यावर येवून संपूर्ण दुर्गंधी पसरली जात आहे. सदर गटार तातडीने साफ करावे व डागडुजीचे काम करावे.
- शिवसेना शाखेसामोर, काजुटेकडी, जांभूळपाडा, पाटकोपर (प), मुंबई – ४०० ०८४ येथील ठिकाणच्या शौचालयाची दुरावस्था झाली आहे. शौचालयाचे छत गळत असल्याने अंगावर घाण पाणी सांडत आहे तसेच शौचकूपे खराब झालेली आहेत. या शौचालयाची दुरुस्ती व वायोवृधांसाठी पाश्चात्य शैलीचे दोन कमोड बसविणे.
- स्वराज्य मित्र मंडळ, काजुटेकडी, पारशिवाडी, घाटकोपर येथे अस्तित्वात असलेले शौचालय अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. भिंतीवरील प्लास्टर, टाईल्स निघून पडल्या आहेत. वरील छत ढासळलेल्या व धोकादायक अवस्थेत आहे. सदर ठिकाणी संरक्षण भिंत व धोकादायक शौचालय पूर्णपणे तोडून नव्याने सर्व सोयी-सुविधायुक्त बांधण्याकरिता तातडीने कार्यवाही करावी.
- हनुमान टेकडी, गफूर शेख चाळ, खडी मशीन हिल नं ४ माडी, मथुरामबाबा मंदिराजवळ, आझादनगर, घाटकोपर (प), मुंबई हा अत्यंत दाटीवाटीची वस्ती असलेला भाग आहे येथे बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक गल्लीमध्ये दिवाबत्तीची व्यवस्था नसल्याने अंधार असतो. त्यामुळे लहान मुले-मुली, वृद्ध व महिला यांना चाचपडत मार्ग शोधावा लागतो. अनेक अप्रिय घटना देखील घडत असतात. याकरिता विभागात दिवाबत्तीची व्यवस्था करणे.
- येथील भागात ओला व सुका कचरा मोठ्या प्रमाणात जमा होत असतो. जमा झालेला कचरा त्या ठिकाणची जागा यांची झाडलोट करणे व त्यांची साफसफाई करणे, सर्व कचऱ्याचे डबे व कचऱ्याच्या पेटया यातील कचरा काढून नेणे; आणि धूळ, राख, केरकचरा, दुषित पदार्थ इत्यादी नेमून दिलेल्या सर्व जागांमधील साचलेले पदार्थ काढून नेणे याकरिता उपरोक्त ठिकाणची नियमितपणे साफसफाई व कचरा हलवण्यासाठी कार्यवाही करणे..
- जय महाराष्ट्र गणेश मैदानाच्या बाजूला महानगरपालिकेचे रुग्णालय गेली दीड वर्षापासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद आहे. आधीच कोरोनाने गरीब जनता त्रस्त आहे त्यातच येथील गरीब रुग्णांना इतरत्र खाजगी रुग्णालयात भटकावे लागत आहे हि गंभीर बाब आहे. संबंधित कंत्राटदाराला आदेश देवून रुग्णालयाचे काम जलदगतीने करावे आणि रुग्णालय रुग्णांच्या सेवेसाठी तातडीने सुरु करण्यात यावे.
- काजूटेकडी- आझादनगर येथे ‘मस्तराम बाबा मठ’ याठिकाणी अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. याच ठिकाणाहून काजूटेकडी –आझादनगरला जाणारा रस्ता आहे. सदरच्या ठिकाणी स्वच्छता, दिवाबत्तीची सोय आणि शौचालय बांधणे या सुविधा उपलब्ध करून देणे.
- प्रभाग क्रमांक १२९ मधील स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय बांधण्याकरिता अर्ज भरून घेतलेले आहेत. अनेक नागरिकांनी स्वखर्चाने घरांमध्ये शौचालय बांधलेले आहेत.परंतु अद्यापी मंजूर झालेला निधी (१५ ते २० हजार) लाभार्थींना मिळाला नाही तो तातडीने मिळावा.