मुक्तपीठ टीम
सध्याचा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच आर्टिफिशियल इंटलिजन्सचा जास्तीत जास्त वापर करत रोजचे काम अधिक सुलभ करण्याचा आहे. भारतीय नौदलही या नव्या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आता प्रयत्न करीत आहे. नवे तंत्रज्ञान अंगिकारण्यासाठी ते व्यवस्थित जाणून घेणे महत्वाचे असते. त्यामुळेच त्यासाठी काही उपक्रमांचे आयोजन सुरु करण्यात आले आहे. अशा प्रयत्नांचाच एक भाग म्हणून भारतीय नौदलाची प्रमुख तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्था आयएनएस वलसुराने ‘भारतीय नौदलासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर नुकतेच एका तीन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. नौदलाच्या दक्षिण विभागाअंतर्गत झालेल्या या तीन दिवसीय कार्यशाळेत, नामवंत माहिती-तंत्रज्ञान कंपन्यां, जसे की गुगल, आयबीएम, इन्फोसिस आणि टीसीएस यांच्या प्रतिनिधीनी याबाबत उद्योगक्षेत्राचा दृष्टिकोन मांडला. तसेच, आयआयटी दिल्लीसह, न्यूयॉर्क विद्यापीठ,अमृता विद्यापीठ आणि डीए- आयआयसीटी सारख्या संस्थांमधील व्याख्यात्यांनी देखील मार्गदर्शन केले.
सध्या कृत्रिम बुद्धीमत्ता या विषयाची सद्यस्थिती आणि त्याचा वापर यावर या सगळ्या चर्चेत भर देण्यात आला. या कार्यशाळेत, दक्षिण नौदल विभागाचे प्रमुख, वाईस अडमिरल एमए हम्पीहोली, यांचे बीजभाषण झाले. सामारिक दृष्टीने नव्या तंत्रज्ञानाचे महत्त्व आणि भारतीय नौदलात त्याचा होणारा वापर, यावर त्यांनी भाष्य केले. या वेबिनारमध्ये 500 प्रतिनिधींनी ऑनलाईन भाग घेतला होता.
भारतीय नौदलाच्या महत्वाच्या मोहिमांच्या क्षेत्रात, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि मशीन लर्निंगचा वापर वाढण्यासाठी नौदलाचे प्रयत्न सुरु आहेत. नौदलाच्या जामनगर इथे असलेल्या आयएनएस वलसुरा ला बिग डेटा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बिग डेटाच्या अत्याधुनिक प्रयोगशाळेच्या उभारणीबाबत, उत्कृष्टता केंद्र म्हणून नावलौकिक मिळवला आहे. जानेवारी 2020 मध्ये आयएनएस वलसुरा स्थापन झाली असून आता कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रासाठीचेही उत्कृष्टता केंद्र तयार करण्याची प्रक्रिया नौदलाने सुरु केली आहे. सध्या, शिक्षणक्षेत्र आणि उद्योगजगताशी समन्वय साधत नौदलाने व्यवस्थापन, मनुष्यबळ आणि अनुमानाचे विश्लेषण अशा क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला आहे. त्याशिवाय, आपला एन्टरप्राइज डेटा एकत्रित करुन, त्याचे पुन:नियोजन करण्याचेही काम सुरु आहे.
संस्थात्मक पातळीवर नौदलाने कृत्रिम बुद्धीमत्ता विषयक एक कोअर गट स्थापन केला असून वर्षातून दोनदा हा गट बैठक घेऊन, कृत्रिम बुद्धीमत्ता/एमएल उपक्रमांचे मूल्यमापन करतो. नौदलाने हाती घेतलेल्या या उपक्रमांचा धोरणात्मक आणि रणनीती अमलात आणण्यासाठी उपयोग होण्याची अपेक्षा आहे. एआय प्रकल्पाचा वेळोवेळी आढावा घेतला जातो, जेणेकरुन ही प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण व्हावेत. तसेच या संदर्भात नौदलाकडून सर्व अधिकारी आणि खलाशांना वेळोवेळी प्रशिक्षण देखील दिले जाते.
नौदलाच्या स्वतःच्या प्रशिक्षण केंद्रात तसेच सुप्रसिद्ध आयआयटी संस्थामध्ये देखील ही प्रशिक्षण दिले जाते. गेल्या तीन वर्षात नौदलाच्या अनेक कर्मचाऱ्यांनी हे प्रशिक्षण घेतले आहे. भारताला कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्याच्या देशाच्या संकल्पांत नौदलाच्या या उपक्रमामुळे मदत होत आहे. सर्वांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करण्याच्या दृष्टीने ही उपक्रम राबवले जात आहेत.