प्रा. हरी नरके
‘रानडे, गांधी आणि जिना’ हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ८० वर्षांपूर्वीचे भाषण अतिशय मौलिक आहे.
त्यात बाबासाहेब म्हणतात,”माणूस चुकतो. पण जो माणूस चुकीच्या बाजूला उभा असतो त्याच्यापासून दूर राहा. मात्र जो माणूस चुकला असला तरी जर तो योग्य बाजूला उभा असेल तर त्याला समजून घ्या. दूर लोटू नका. गेले काही दिवस समाज माध्यमांवर अमोल कोल्हे, नथुरामची भूमिका आणि बरेच काही यावर गदारोळ माजलेला आहे. एव्हाना गाळ खाली बसला असेल व पाणी बरेच निवळले असेल असे वाटते.
१) कोल्हे यांना कलावंत म्हणून भूमिका निवडण्याचे स्वातंत्र्य असले तरी त्यांनी ही भूमिका करायला नको होती. ही फक्त भूमिका नाही, एका दहशतखोर विचारधारेचा पुरस्कार करणे होय. तिचे कोणतेही समर्थन असत नाही.
२) २०१७ साली ही भूमिका स्वीकारली हे आपले चुकले अशी प्रांजळ कबुली देऊन त्यांनी दिलगिरी व्यक्त करायला हवी होती असे मला वाटते.
३) नथुराम हा मानवतेचा गुन्हेगार होता, आहे. त्याचे उदात्तीकरण म्हणजे साधनसुचिता, सत्य, अहिंसा, सहिष्णुता, कायदा, संविधान यांचा निर्घृण खून होय. नथुरामची बाजू घेणे (भूमिका करणेसुद्धा) म्हणजे चुकीच्या बाजूला उभे राहणे होय. ही साधी चूक नाही. हे म्हणजे न्यायाची बाजू सोडून विचारपूर्वक अन्यायाच्या बाजूला जाऊन उभे राहणे होय यात शंकाच नाही.
४) खासदार कोल्हे यांच्यावर लिहिताना बहुतेक लोकांची पातळी घसरली. नकली गांधीवादी तर मोहीमच चालवू लागले. अण्णा हजारे यांच्यासारख्या लबाड, सुमार आणि संघीय इसमाची सतत तळी उचलणारे लोक तर पिसाळल्यासारखे परत परत रान उठवीत राहिले. कोल्हे या आडनावावर कोट्या करणारे मग ते कोणीही असले तरी अभिरुचीहीन आणि व्यक्तीच्या अपंगत्वावर विनोद करणारे असतात त्या पंगतीत बसणारे होते. अशांचा निषेधच होय.
५) कोल्हे हे आडनाव हा अमोल यांचा चॉईस होता/असतो काय? मुळात नाव, आडनाव, रंग, अपंगत्व यावर कोट्या करणारे हीन अभिरुचीचेच असतात. आहेत.
६) अनेकांनी आपली शरद पवार, राष्ट्रवादी पक्ष, अमोल कोल्हे यांच्यावरची खुन्नस काढायची संधी मानून अत्यन्त गलिच्छ भाषेत गरळ ओकली.
७) पवार, कोल्हे यांच्याशी तुमचे पिढीजात वैर असेल तर ते मी समजू शकतो. या नावांची तुम्हाला अलर्जी असणंही मी समजू शकतो. तुम्हाला त्यांचा चेहरा आवडत नसेल तर तो तुमचा आजार आहे. नथुरामच्या आडून कोल्हे,पवारांवर कोणी लिहावे? देवेंद्रभक्त, संघीय पिलावळ, अण्णाबाज, आंबापैदासी यांना यावर लिहीण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.
८) काही सच्चे गांधीवादीसुद्धा इतके संतापले की त्यांचा तोल गेला. नथुरामपेक्षा त्यांचा अमोल कोल्हे, शरद पवार यांच्याबद्दलचा विखार बाहेर पडला. नथुरामची भूमिका हे त्यांना फक्त निमित्त हवे होते. जुने रागलोभ सेटल करायचे होते. बहुसंख्य लोक संधीची वाटच बघत असतात. कसलेही किरकोळ निमित्त त्यांना पुरते.
९) मी राष्ट्रवादी-कोल्हे-पवारांचा प्रवक्ता नाही. त्यांच्यावर हवी तेव्हढी टीका करा. पण लोकशाहीचे शत्रू, संविधान विरोधी, जातीयवादी, खुनशी, धर्मांध शक्तींना रोखण्यात पवारांचे जेव्हढे योगदान आहे त्याच्या गुंजभरही योगदान नसलेले जेव्हा उठसुठ पवारांना जातीयवादी ठरवतात तेव्हा त्यांच्या सांस्कृतिक -राजकीय पर्यावरण विषयक आकलनाची कीव वाटते. पवारांच्या कित्येक खेळी मलाही आवडत नाहीत. पण महाराष्ट्र आज नथुरामशक्तीच्या तावडीत नाही याचे राजकीय श्रेय पवारांना नसेल तर मग ते समाजमाध्यमांवरील तुम्हा थोरामोठयांनाच असणार!
१०) सामाजिक गतिशास्त्राची ज्यांना साधी तोंडओळखही नाही तेच लोक दार्शनिक बनून पवारांना प्रवचन देत असतात हे हास्यास्पद आहे.
११) माझी वरील मतं तुम्हाला पटलीच पाहिजेत असे नाही.
तर, चला, कोल्हे, एनसीपी, पवार विरोधकांनो किंवा नथुभक्तांनो उचला लेखण्या आणि घाला शिव्या. हीच महात्मा गांधींची शिकवण आणि साधनसुचिता असणार!