मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र शासनाच्या जे जे रुग्णालयातील सेवेत समावेश करण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषणास बसलेल्या महाराष्ट्रातील १८ वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांनी कँडल मार्च काढला. सोमवार, १७ जानेवारीपासून सहाय्यक प्राध्यापक उपोषणास बसले आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा असाच चालू राहणार आहे, असे कँडल मार्चच्या वेळी सांगण्यात आले.
‘आमच्या आयुष्यातील अनिश्चिततेचा अंधकार दूर व्हावा व लवकरात लवकर आम्हाला शासनात समावेश करावे आणि आमच्या मागण्यांना न्याय मिळावा, अशी मागणी वैद्यकीय शिक्षकांनी यावेळी व्यक्त केली. मागील ५ हुन अधिक वर्ष आम्ही या रुग्णालयात सेवा देतोे, लाखो रुग्णांचे प्राण वाचवत आहोत, हजारो विद्यार्थ्यांना शिकवतो शिवाय शैक्षणिक कामकाजाबरोबर इतर अनेक प्रशासकीय कामे करतो, अनेक कॅम्पच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत आहोत. तरीही आम्ही अधिकारापासून वंचित आहोत अशी खंत डॉक्टरांनी व्यक्त केली.
‘आमचे वृद्ध आई वडील, लहान मुले आहेत. दरवर्षी आम्हाला १ दिवसाचा खंड देऊन किंवा कित्येक जण ४ महिन्यांच्या आॅर्डरवर काम करतात. पुढची आॅर्डर वेळेवर निघेल की नाही याची अनिश्चितता सतत •ोडसावते. आम्ही खाजगी रुग्णालयात लाखो रुपये कमावू शकलो असतो किंवा इतर राज्यात जाऊन सेवा दिली असती, मात्र आपल्या लोकांची सेवा करत आहोत. कित्येक वर्ष आम्ही कंत्राटी पदावर काम करत आहोत. सरकारने वेळोवेळी आम्हाला समावेश करण्यात येईल, अशी ‘फक्त’ आश्वासने दिली. पण आता आमच्या संयमाची सीमा संपत आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातून ‘कँडल मार्च’साठी सगळे इथे जमले आणि साखळी उपोषण करत आहोत. पण आमच्या आंदोलनाची राज्य सरकारने साधी दखलही घेतली नाही, हे खूप विदारक आहे, असे डॉ. प्राजक्ता थेटे म्हणाल्या.
‘आमचा जे.जे. रुग्णालयाच्या सेवेत समावेश झालाच पाहिजे, कोविड योद्ध्यांना न्याय द्या, अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांना स्थायी करा, असे नारे या अस्थायी डॉक्टरांनी दिले. या ना-यांमुळे कदाचित झोपलेले सरकार जागे होऊन, आमच्या मागण्या मान्य करेल, असे अपेक्षा डॉ. अमित यांनी व्यक्त केली. काल ह्याच डॉक्टरांनी रक्तदान शिबीर आयोजिले होते.