मुक्तपीठ टीम
इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी युवकांना चिथवणाऱ्या मुंबईतील मालवणी मधील दोन दोषी युवकांना विशेष एनआयए न्यायालयाने शुक्रवारी आठ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यांना भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हेगारी कट रचल्याबद्दलही दोषी ठरवण्यात आले होते. २०१८ मध्ये या दोघांवर आरोप निश्चित करण्यात आले होते. या दोघांवरही मालवणी आणि जवळपासच्या तरुणाांना इसिस मध्ये भर्ती होण्यासाठी प्रेरित केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मोहसीन सय्यद (३२) आणि रिजवान अहमद (२५) असे या दोघांचे नाव आहे. दोषी मोहसीन सय्यद हा यापूर्वीच साडेपाच वर्ष आणि रिझवान अहमद हा सहा वर्ष तुरुंगात आहेत.अटक झाल्यापासून तुरुंगात असलेल्या सय्यद आणि अहमद यांनी गेल्या महिन्यात आपला गुन्हा कबूल करण्यासाठी विशेष न्यायालयात धाव घेतली होती.
विशेष न्यायाधीश एटी वानखेडे यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांना बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत कट रचल्याबद्दल आणि प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचे सदस्य किंवा समर्थन केल्याबद्दल दोषी ठरवले होते.
न्यायालयाने शुक्रवारी त्यांना आठ वर्षांचा कारावास आणि ३५-३५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) च्या म्हणण्यानुसार, या दोन दोषींच्या चिथावणीमुळे मुंबईतील मालवणी भागातील चार तरुण इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) मध्ये सामील होण्यासाठी घर सोडून गेले होते.