सुमेधा उपाध्ये
अध्यात्म म्हणजे नेमके काय असा प्रश्न अनेकदा पडतो. याबद्दल अनेकांनी अनेक व्याख्या आपल्या संस्कारातून अनुभवातून केल्या आहेत. पण मला वाटतं अध्यात्म म्हणजे दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानता येणं. अध्यात्म म्हणजे दुसऱ्यांप्रती सहिष्णुता असणं. अध्यात्म म्हणजे सर्वांवर एक सारखंच प्रेम करणं. अध्यात्म म्हणजे सेवा भाव वाढवणं. आपल्याकडे जे जास्त आहे ते ज्याच्याकडे जे नाही त्याला त्यातील देणं…नित्य कर्म करत असताना अखंड नामजपात राहून साधलेलं मौन; म्हणजेही अध्यात्मच.
आपण मौन पाळले की नाम वाढत जातेच. सतत बोलत राहिलो, बहिर्मुख राहिलो तर त्या परमात्म्याचे नाम कसं घेणार. हा नाम जप जेवढा आत मुरत जाईल, तस तसा आपला आतला प्रवास सुरू होतो. हा प्रवास आपल्याला बाहेर पाहण्याची गरज भासू देत नाही. नामावर एकाग्रता वाढत गेली की काही दिवसांनी असा प्रत्यय येतो की नामही राहिले नाही तर केवळ सोSहंम् सुरू आहे. या सोSहंम् च्या तालावर म्हणजेच आपल्या प्राणावर, त्याच्या आत बाहेर जाण्याच्या क्रियेवर आपण छान आनंदात डुलत राहतो. एका मोठ्या प्रकाशाच्या साम्राज्यात जातो आणि नंतर केवळ चराचरातील चैतन्य आपल्यातच सामावलेले जाणवते. सर्वच एका पातळीवर आहे, हे समजू लागतं. तसं झालं की मग द्वैत राहत नाही. त्यामुळे जस जसं आपण आपल्याच आत खोल खोल जातो तस तसं आपल्यातील संयम वाढतो, विवेक बुद्धी वाढते. एक आत्मिक समाधान असतं, त्यामुळे राग द्वेष मत्सर माझं तुझं सारं सारं गळून जातं.
मौनाच्या यात्रेमुळे आपण दुस-याचे ऐकून घेण्यास शिकतो. त्यानंतर अत्यावश्यक असेल तरच प्रत्युत्तर देतो. पण तेही अत्यंत विवेकपूर्ण असतं. आपल्याला कुणाशीच वैर नसतं स्पर्धेतील फोलपणा जाणवतो आणि सर्वांच्याच भल्यासाठी प्रार्थना सुरू होते. सर्वांचेच प्रती एकच भावना निर्माण होणं, सर्व जीवात एकच चैतन्य असल्याचं जाणवल्यानंतर सर्वांनाच आपापल्यापरीने जगण्याचं स्वातंत्र्य आहे हे मान्य होतं. त्यानंतर दुजा भाव शिल्लक न राहिल्याने आपल्याकडून कोणासही दुखावले जात नाही. कोणत्याही जीवास त्रास होऊ नये सर्व त्या परमात्म्याचीच लीला आहे हे समजणं म्हणजे अध्यात्म. या मार्गावर चालायचे असेल तर गरज नाही कुठे लांब जाऊन एकांतात रहाण्याची. किंवा कुठल्याही बाह्य वेशभूषेची की सर्व काही त्याग करण्याची. आपल्या गृहस्थाश्रमी राहून आपल्या वाट्याची सर्व कर्म करता करता हे साध्य होऊ शकतं. त्यासाठी फक्त इच्छा हवी. आपले नित्य कर्म आणि गृहस्थाश्रमाची गरज असेले अर्थाजनही करावेच लागते ते करत करतच आपण जेवढे सर्व त्या नामजपाच्या तालावर करू तेवढे ते उत्तम होते. स्थूल देह त्याचे कार्य करीत राहिलच. पण ते प्रत्येक कार्य आंतरमनातील जपाच्या सहाय्याने होत राहिले की उत्तमच होते. जेवढं जमेल तेवढं मौन राहण्याचा प्रयत्न करून आपण दोन्ही पातळ्यांवर हे सर्व साध्य करू शकतो. मात्र, यासाठी सुरूवातीच्या काळात थोडी कसरत करावी लागते. पण नंतर सवयीने हळू हळू दोन्ही पातळ्यांवर समन्वय साधला जातो. दोन्ही मार्ग वेगवेगळे दिसले तरीही शेवटी एकाच महामार्गावर जातात.
कित्येकदा असं लक्षात येतं की आपण विनाकारण बोलत असतो. बाह्य जगात आणि आंतरमनातही. दोन्ही स्तरावरील बडबडीमुळे आपली शक्ती विनाकारण खर्च होत राहते. नामजपाचा सराव केल्यामुळे आंतरीक म्हणजे मनाची सततची बडबड बंद होते. तर कामात व्यग्र राहिल्याने बाह्य बोलणं थांबतं. विनाकारण दुसऱ्य़ाशी बोलण्याच्या सवयीने अनेकदा आपले काम तर राहतेच पण समोरच्याच्या कामातही व्यत्यय निर्माण करतो. तर कित्तेकदा अति बोलण्याच्या सवयीने आपण स्वत: अडचणीत योतो तर कधी दुसऱ्यांनाही अडचणीत आणतो. आत बाहेर दोन्ही पातळीवर अशांतता निर्माण होते. त्यामुळे ज्यास अध्यात्मिक पातळीवर म्हणजे परमात्म्याशी एकरूप व्हायचेय त्यांनी जरूर मौनाचा अभ्यास करून पहावा आणि लौकिकातही त्यामुळे जो लाभ होतो त्याचा अनुभव घ्यावा. कळत न कळत हे मौन आपल्याला खूप काही देऊ जाते. फक्त त्यावर विश्वास ठेवून तसं आचरण करण्याची सवय लावली की झाले. अध्यात्म म्हणजे फार क्लिष्ट वगैरे काहीही नाही. रोजच्या जगण्यातल्या काही उत्तम सवयी लावून घेतल्या तर तो दयाळू परमात्मा आपल्याच आत आहे याचा साक्षात्कार नक्कीच होतो. फक्त आपण एक पाऊल तरी त्याच्या दिशेने टाकले पाहिजे. मग तोही आपल्याकडे धावत येतो. तो नेहमीच आपली वाट पहात आत बसलाय. आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही इतकंच. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. हेच सत्य!
(सुमेधा उपाध्ये या पत्रकारितेतील दीर्घ अनुभवानंतर आता सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत)
Khup Chan
Kelyane hot aahere aadhi kelech pahije True