मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील हजारो अनाथांची माय आज सर्वांना पोरकं करून गेली. हजारोंवर मायेची पखरण करणारी, कधी दटावणारी, पण नेहमी प्रेमानं कवटाळणारी, आईसारख्या सिंधुताई आज देवाघरी गेली. त्यांना मुक्तपीठ टीमची श्रद्धांजली…
ज्येष्ठ समाजसेविका, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्या ७५ वर्षांच्या होत्या. आज रात्री ८ वाजून १० मिनिटांनी त्यांचं निधन झाले. पुण्यातल्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महिन्याभरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.
नकुशी ते पद्मश्री पटकावणारी अनाथांची माय
- वर्धा जिल्ह्यातल्या नवरगावात १४ नोव्हेंबर १९४७ रोजी जन्म
- मुलगी नको होती, पण मुलीच्या जन्मामुळे घरातल्यांनी चिंधी नाव ठेवलं
- सुविधांचा अभाव आणि इतर कारणांमुळे फक्त चौथीपर्यंतच शिक्षण झालं.
- ९व्या वर्षी वयाने २६ वर्ष मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्यासोबत लग्न झालं.
- अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताईंनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती.
- १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली.
- आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदनमध्ये दाखल केलं
- त्यांनी इतर अनाथ मुलांना आधार दिला.
- त्यांच्या संस्थेत लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते.
- त्यांचं जेवण, कपडे, अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते.
- शिक्षण पूर्ण झाल्यावर इथली मुलं आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिलं जातं.
- आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते.
- सुमारे १ हजार ५० मुलांचा सांभाळ या संस्थेने केला आहे.
- २०२१ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मान
- महाराष्ट्र सरकारक़डून २०१२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार
- २०१० मध्ये महाराष्ट्र सरकारचा अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मान
- जवळपास ७५० आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित