मुक्तपीठ टीम
दिल्ली पोलिसांनी ट्विटरकडून ‘बुल्ली बाई’ अॅपबद्दल प्रथम ट्विट करणाऱ्या अकाऊंटची माहिती मागवली आहे आणि त्यावरून वादाशी संबंधित आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्यास सांगितले आहे. यासोबतच ‘बुल्ली बाई’ अॅप डेव्हलपरचीही माहिती मागवण्यात आली आहे.
दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी ‘बुल्ली बाई’ या मोबाईल अॅपवर मुस्लिम महिलांच्या फोटोशी छेडछाड केल्याप्रकरणी आणि अश्लील फोटो पोस्ट केल्याबद्दल अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक आणि पोलास अधिकाऱ्यांनी अॅप निर्मात्यांना पकडण्यासाठी तपास सुरू केला आहे. गिटहब नावाच्या प्लॅटफॉर्मवर बनवलेला हा अॅप सध्या ब्लॉक करण्यात आला आहे. एजन्सी देखील गिटहबवरून माहिती गोळा करत आहेत. या अॅपविरोधात मुस्लिम महिलांमध्ये संताप वाढत होता.
बुल्ली बाई अॅपमध्ये सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या १०० हून अधिक मुस्लिम महिलांचे फोटो दाखवले जात होते. यामध्ये अनेक पत्रकार आणि विविध संघटनांशी संबंधित कार्यकर्ते आहेत. एका महिला पत्रकाराने रविवारी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडे एफआयआरसाठी तक्रार दाखल केली. अॅपवर त्याचे अश्लील छायाचित्र पोस्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याला ऑनलाइन शोषण आणि गंभीर गुन्हा म्हणत कारवाईची मागणी केली. केवळ मुस्लिमच नाही तर सर्व महिलांना धमकावण्यासाठी हे केले जात असल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या तक्रारीनंतर देशातील अनेक महिला पत्रकारांनी अॅपविरोधात ऑनलाइन मोहीम सुरू केली, ज्याला मोठा पाठिंबा मिळत आहे.
सुल्ली डील्स प्रकरण
- गेल्या वर्षी जुलैमध्ये गिटहबवरच सुल्ली डील्स नावाचे अॅप तयार करण्यात आले होते.
- यामध्येही मुस्लिम महिलांचे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय पोस्ट करण्यात आले होते.
- पोलीस आणि महिला आयोगाने याची दखल घेत कारवाई सुरू केली, त्यानंतर गिटहबने अॅप ब्लॉक केले.