मुक्तपीठ टीम
विहंग गार्डन ठाणेच्या १३ मजल्याच्या दोन इमारतींचे अनधिकृत बांधकाम करणारे विकासक प्रताप सरनाईक यांच्यावर फौजदारी कारवाई व त्यांच्याकडून ११ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात यावा या मागणीसाठी आज भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांच्यासमवेत आमदार निरंजन डावखरे, गटनेते संजय वाघुले, नगरसेवक मिलिंद पाटणकर, आणि कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिकेच्या बाहेर प्रतिकात्मक ठिय्या आंदोलन केले.
आंदोलकांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले व काही वेळेनंतर सुटका केली.
ठाकरे सरकार प्रताप सरनाईक यांना वाचवित आहेत. ११ कोटींचा दंड माफ करण्याची गोष्ट करीत आहेत व फौजदारी कारवाई करण्यास चालढकल करीत आहेत. असे डॉ. किरीट सोमैया यांनी या प्रसंगी सांगितले.
शिवसेना नेता बिल्डर आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे येथे विहांग गार्डन बी१ आणि बी२ या १३ मजल्याच्या दोन अनधिकृत इमारती बांधून १०० हून अधिक सदनिकाधारकांची फसवणूक केली आहे. २००८-०९ आणि २०१२ मध्ये ठाणे महानगरपालिकेने या इमारतीला वापर परवाना देण्याचा नकार दिला व या इमारती अनधिकृत आहेत असे घोषित केले. त्यानंतर २०१२ मध्ये ठाणे महानगरपालिकेने, महाराष्ट्र सरकारने या बिल्डिंग पाडण्याचे आदेश दिले.
प्रताप सरनाईकच्या विनंतीला मान देऊन २०१२-१३ मध्ये या बिल्डिंगला नियमित, अनुमती देण्याचा प्रस्तावाला तत्कालीन शासनाने, ठाणे महानगरपालिकेने अनुमती दिली.
यासाठी विकासकांना टिडीआर व दंड म्हणून रु. ३,३३,९६,८४२ भरण्याचे निर्देश देण्यात आले.
नियमाप्रमाणे प्रताप सरनाईक, बिल्डरनी २००८-०९ ते २०२१ पर्यंत हे अनधिकृत बांधकामाचे पेनल्टी, दंड म्हणून रूपये ११ कोटी भरणे अपेक्षित असताना त्यांनी फक्त रु. २५,००,००० इतकी रक्कम भरली आहे आणि उर्वरित दंड व फौजदारी कारवाई माफ करावी असा अर्ज प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
सरनाईक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा किरीट सोमैया यांनी दिला. तसेच, प्रताप सरनाईक यांच्याकडून रूपये ११ कोटी किंवा आजच्या प्रमाणे जो दंड होणार तो ताबडतोब वसूल करावा व त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.