मुक्तपीठ टीम
रोडपती असो की करोडपती, वाढदिवस म्हटला की तो दणक्यातच, असं ठरलेलंच. आता कोरोना संकट काळ आहे. काळजी घेतली पाहिजे. पण तेव्हाही लोक बिनधास्त वागतात. जोशात सेलिब्रेशन करतात. पण त्याचवेळी सध्या व्हायरल झालेला एक व्हिडीओ खूप काही सांगणारा. देशातील कुबेर म्हणता येतील अशांपैकी एक असणारे उद्योगपती रतन टाटा यांच्या वाढदिवसाच्या म्हणजे २८ डिसेंबरचा हा व्हिडीओ आहे. त्यादिवशी रतन टाटा ८४ वर्षांचे झाले. उद्योगपती हर्ष गोयनका यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रतन टाटा त्यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करत आहेत. ३० सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये रतन टाटा तरुण उद्योगपती शंतनू नायडूसोबत दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला ते कपकेकवर एकच मेणबत्ती विजवताना दिसत आहे. त्याचा व्हिडीओही ते तयार करत आहेत. जवळच बसलेला शंतनू टाळ्या वाजवत अभिनंदन करत आहे. नंतर शंतनू उठतो आणि रतन टाटा यांच्या खांद्यावर आणि पाठीला प्रेमाने स्पर्श करतो. मग त्यांना कपकेकमधून लहान घास भरवतो. या व्हिडीओत साधेपणा दिसत असला तरी एका महान व्यक्तिमत्वाचा हिमालयापेक्षाही मोठेपणा मात्र मनावर ठसतोय…
रतन टाटांचा जीवन प्रवास…
- रतन टाटा यांचा जन्म गुजरात राज्यातील सुरतमध्ये २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला.
- रतन टाटा हे नवल टाटा यांचे पुत्र आहेत.
- रतन टाटा यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईतील कॅम्पियन स्कूलमध्ये झाले.
- त्यांचे माध्यमिक शिक्षण कॅथेड्रलमध्येच झाले.
- त्यांनी जॉन केनन कॉलेजमधून आर्किटेक्चरमध्ये बीएससी केले. त्यानंतर कॉर्नेल विद्यापीठातून १९६२मध्ये कम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले.
- १९७५ मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले.
टाटा समुहाची जबाबदारी…
- १९९१ ते २०१२पर्यंत रतन टाटा हे टाटा समूहाचे अध्यक्ष होते.
- २८ डिसेंबर २०१२ रोजी ते टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाले.
- त्यानंतरही ते टाटा समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.
- ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली त्या सायरस मिस्त्रींच्या कार्यपद्धतीशी मतभिन्नतेमुळे त्यांनी पुन्हा टाटा समुहाच्या कामकाजात लक्ष घातले.
- त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह लोकल ते ग्लोबल झेपावला.
- टाटा समूहाची प्रगती ही जगभरातील उद्योगांचं लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.
- टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा टी, टाटा केमिकल्स, इंडियन हॉटेल्स आणि टाटा टेलिसर्व्हिसेस या टाटा समूहाच्या सर्व प्रमुख कंपन्यांचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले आहे.
टाटांसोबत वाढदिवस कोणी साजरा केला?
- व्हायरल झालेल्या व्हिडीओत बर्थडे बॉय रतन टाटा यांच्यासोबत दिसणाऱ्या तरुणाचे नाव शंतनू नायडू आहे.
- सध्या तो २८ वर्षांचा आहे.
- त्याने एवढ्या कमी वयातच उद्योग क्षे्त्रात वेगळे स्थान मिळवले आहे. शंतनूच्या भन्नाट कल्पनांमुळे त्याने रतन टाटा यांचेही लक्ष वेधून घेतले आहे.
- शंतनूची मोटोपॉज नावाची कंपनी असून ही कंपनी डॉग कॉलर बनवते.
- हे कॉलर अंधारात चमकतात जेणेकरून कोणतेही वाहन त्यांना धडकू शकत नाही.
- त्याच्या कल्पनाशक्तीमुळेच बहुधा रतन टाटा स्टार्टअपमध्ये स्वत:ची गुंतवणूक करताना कल्पना तपासण्यासाठी शंतनूचा सल्ला घेतात, अशी चर्चा आहे.
पाहा व्हिडीओ: