-
तुळशीदास भोईटे
बस झालं आता. असे बरळणे खुपणारेच. नव्हे संताप यावे असेच. भाजप नेत्यांनी कारवाईची मागणी केली म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करण्याविषयी मागेपुढे पाहू नये. काँग्रेस असो की राष्ट्रवादी कुणालाही खुपेल असेच आहे शार्जीलचे बरळणे. अनेकांच्या तशा प्रतिक्रियाही वाचल्या. कृपया थेट कारवाई करा. जर कुणीही आडवं जरी आलं तरी पर्वा करू नका. धर्मांध धर्मांधच असतात. त्यातही पुन्हा ते जाणीवपूर्वक, ठरवून गरळ ओकत असतील, तर त्यांना जरब बसावी अशी कारवाई झालीच पाहिजे. तुम्ही फक्त मुख्यमंत्री नाही. तुम्ही मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आहात. हे दाखवून देण्याची, हीच ती वेळ!
काही तरी करायचं आणि चर्चेत राहायचं. वाद निर्माण करायचा आणि आणखी जास्त चर्चेत यायचं. एक व्यसनच असतं हे. विचार कोणतेही असो, प्रत्येक विचारांच्या काहींमध्ये हे व्यसन असतेच असते. मग त्यांच्या विचारांचा, त्यांच्या मूळ उद्देशाचा त्यामुळे घात झाला तरी त्यांना त्याची पर्वा नसते. किंवा व्यसनाच्या नशेत त्यांना कळतही नसते. हिंदीत प्रसिद्धीच्या या व्यसनींना छपासरोगी असा शब्द आहे. हा रोग जोपर्यंत त्यांच्यापुरता मर्यादित तोपर्यंत फार फरक पडत नाही पण त्याचा अतिरेकी फैलाव प्रसिद्धीची नशा वाढवतो. आणि मग समाजाचाही घात होऊ लागतो.
हे सारं आठवलं ते पुण्यात पार पडलेल्या एल्गार परिषदेतील घृणास्पद बरळणं ऐकून. होय, बरळणंच! गेले चार दिवस या परिषदेतील शार्जील उस्मानींच्या बरळण्यावर वाद माजला आहे. आधी वाटले केवळ संदर्भ तोडून काही वाद निर्माण केला जातो आहे की काय! उगाच भाजपच्या नेत्यांनी आक्षेप घेतला की काय?
पूर्ण भाषण ऐकलं आणि लक्षात आलं शार्जीलने फाजिलगिरी नाही तर घातपाती बकवास जाणीवपूर्वकच केली आहे. उस्मानीने हिंदू धर्मीयांच्या बाबतीत जे घृणास्पद उद्गार काढले ते त्यांना खरेतर जोड्याने मारायच्याच लायकीचे आहेत. विचार वगैरे ठिक आहे. मांडावेच. बेधडक मांडावे. मात्र, ते मांडताना भानही राखावे. व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य आहे ना… डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या परिश्रमातून उभ्या राहिलेल्या ज्या संविधानाला तो एक करार आहे, असे म्हणाला त्या संविधानानेच स्वातंत्र्याची हमी दिली आहे. मात्र, स्वातंत्र्य मग ते कोणतेही असो, हक्कासोबत कर्तव्य येतं तसं स्वातंत्र्यासोबत जबाबदारीही येते. नाही तर ते स्वातंत्र्य नसेलच. स्वैराचार होईल.
स्वातंत्र्यांची खूप छान व्याख्या वाचली होती राज्यशास्त्राच्या एका पुस्तकात. स्वातंत्र्य कसं असावं? तुमच्या हातात काठी आहे. ती तुमच्या चारही बाजूंना तुम्ही फिरवू शकता. ते स्वातंत्र्य आहे. पण कुठपर्यंत? तर ती दुसऱ्याला स्पर्श करत नाही तो पर्यंतच! पण जेव्हा तुमची काठी दुसऱ्यांना लागू शकते, तेव्हा त्याआधीच तुमच्या स्वातंत्र्याची मर्यादा संपलेली असते.
शार्दिलसारखे शाब्दिक अतिरेकी जाणीवपूर्वकच असं बरळतात. त्यातून घडते ते हेच. ते काठी फिरवू लागतात. नव्हे ते शब्दांचे दुधारी शस्त्र चालवू लागतात. त्यांना शब्द शस्त्रांचा तो हवेला कापणारा आवाज ड्रग्जच्या ट्रांससारखा गुंगवत असावा. किंवा जाणीवपूर्वकच ते त्यात गुंगत असावेत. त्यातूनच मग शार्जील नको ते बरळले.
एखाद्या माणसाला मारलं जाणं वाईटच. समर्थन असूच शकत नाही. पण जेव्हा त्यासाठी एका संपूर्ण धर्माला तुम्ही दोष देता तेव्हा अप्रत्यक्षरीत्या तुम्ही विशिष्ट धर्माच्या आंधळ्या समर्थकांच्या भूमिकेत जाता. तुम्ही तटस्थ राहतच नाही. धर्मनिरपेक्ष वगैरे जे लेबल किंवा बुरखे तुम्ही पांघरता ते आपोआपच टरकावले जातात आणि तुमचेच भयावह धर्मांध चेहरे उघडे पडतात!
काय बरळला शार्जील उस्मानी?
‘आज का हिन्दू समाज, हिंदुस्तान में हिंदू समाज बुरी तरीके से सड़ चुका है। ये जो लोग लिंचिंग करते हैं, कत्ल करते है, ये कत्ल करने के बाद अपने घर जाते है तो क्या करते होंगे अपने साथ? कोई नए तरीके से हात धोते होंगे, कुछ दवा मिलाकर नहाते होंगे। क्या करते है ये लोग की वापस आकर हमारे बीच खाना खाते है, उठते-बैठते है, फिल्में देखते है। अगले दिन फिर किसीको पकड़ते है फिर कत्ल करते और नॉर्मल लाईफ जीते है। अपने घर में मोहब्बत भी कर रहे है, अपने बाप का पैर भी छू रहे है, मंदिर में पूजा भी कर रहे है, फिर बाहर आकर यही करते है…’
शार्जील म्हणजे कुणी विचारवंत नाहीत. शार्जीलचा भूतकाळ फार कौतुक करावं असा नाही. विश्वास ठेवावा असा तर नाहीच नाही. तरीही त्यांना सन्मानानं बोलवायचं आणि वाट्टेल ते बरळू द्यायचं. चला बोलावले. हरकत नाही. सर्व विचारांना बोलू दिलंच पाहिजे. पण किमान ते बरळताच आयोजकांनी त्या मुद्द्यावर रोखायला नको? हिंदू किंवा अन्य कोणताही समाज सडलेला आहे, असे म्हणणे म्हणजे मुळातच बोलणाऱ्याचा मेंदूच सडका आहे. त्या सडकेपणाचाच दुर्गंध जर तो तोंडावाटे शब्दांमधून सोडत असेल, तर उपस्थितांपैकी आयोजकांनी रोखायला नको का? जर शार्जीलने काही विशिष्ट अपप्रवृत्तींना दोष देत सडल्याचा आरोप केला असता, चालले असते. त्याने काश्मिरातील धर्मांध दहशतवादी कुकृत्यांचा उल्लेख करत, पण पुन्हा विशिष्ट घटकांनाच अवघ्या हिंदू समाजाला नाही, सडलेले म्हटले असते तर चालले असते. पण त्याने तसे केले नाही. आजचा हिंदू समाज. हिंदूस्थानातील हिंदू समाज वाईट पद्धतीने सडला, असे तो बरळला, तेथेच त्याचा सडका मेंदू दिसला.
माजी न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील होते तेथे. आयोजक तेच असे कळले. आज त्यांच्याशी बोललो. का घात करता? असे विचारले. तुम्हाला वाद निर्माण करणे आवडते. चर्चेत राहणे आवडत असेल. पण त्यामुळे जे विचार तुम्ही मांडता, ज्यांचा पुरस्कार करता असा दावा करता, त्यांचाच घात होतो, असेही बजावले. खरंतर खूप ज्येष्ठ आहेत. मी मराठी, जय महाराष्ट्र अशा चॅनलना असताना त्यांना विषयानुसार लाइव्ह चर्चेत सहभागी करायचो. अनेकदा ते नको ते बोलून जायचे. मग ब्रेकमध्ये फोन करायचे. “अहो, मी तुमची नोकरी तर खात नाही ना?” दोन-तीन वेळा झाले. मी हसून साजरे करायचो. ऑन एअर सन्मानानं हे चुकीचं आहे, याची जाणीव करून द्यायचो. एकदा राहवले नाही. ब्रेकनंतर माझी बोलण्याची वेळ येताच बोललो, “माननीय कोळसे पाटील यांचा ब्रेकमध्ये फोन होता. मोदींविरोधात बोलल्यामुळे माझी नोकरी तर खाल्ली जाणार नाही ना, असे विचारणारा. मला त्यांना सांगायचंय. कृपया माझ्या नोकरीची काळजी सोडा. बेधडक बिनधास्त बोला. फक्त बोलताना ज्यांच्याबद्दल बोलता ते पंतप्रधान पदावर आहेत, याचे कृपया भान राखा!” आज त्यांना सांगावे लागले. शार्जीलसारख्यांना वाट्टेल ते बरळू देऊन तुम्ही सर्वच पुरोगामी विचारांच्या समर्थकांचा घात करता आहात.
शार्जील उस्मानींच्या बरळण्यानंतर लक्षात आले भलतेच काही घडते आहे. बिघडवते आहे. एल्गार परिषद म्हणजे प्रतिगाम्यांविरोधातील पुरोगाम्यांचा एल्गार वगैरे म्हटले जाते. प्रक्षोभक भाषणांनंतर कारवाई झाली तर स्वांतंत्र्यावर गदा आल्याचे आरोपही होतात. पण प्रत्यक्षात या एल्गार परिषदेच्या मंचावरच काही भाजपचे हितचिंतक वावरतात की काय असे वाटते. होय, भाजपचे हितचिंतक!! पुरोगामी विचारांमध्ये व्यासपीठऐवजी विचारपीठ असा आणखी चांगला शब्द मंचासाठी वापरला जातो. विचारपीठावर विचारवंतच, किमान विचारशील वक्ते असणे अभिप्रेत असते. मात्र, अशा विचारपीठावर जेव्हा शार्जील उस्मानींसारखे अवघ्या हिंदू धर्माला सडलेला म्हणणारे गटारी मुखाचे वावरतात. वाट्टेल ते बरळतात. तेव्हा हित कुणाचं साधलं जातं? मुद्दे कुणाला मिळतात? आता यासाठी मी भाजपला दोष देत आहे, असा कृपया ग्रह करून घेऊ नका. भाजप काय किंवा अन्य कोणताही राजकीय पक्ष काय, असा फुल टॉस कुणी देणार असेल तर फटकवणारच. त्यातही कोणत्याही सामान्य हिंदूच्या भावना दुखावल्या जातील असं कुणी बरळणार असेल तर जसं मला ते आक्षेपार्ह वाटतं. नव्हे खुपतेच. तसेच ते भाजपच्याही नेत्यांना खुपले. त्यांनी राज्य सरकारकडे कारवाईची मागणी केली. ते आक्रमक झाले, तर त्यात गैर काय?
आता घटनाक्रम लक्षात घ्या. दिल्लीत शेतकरी आंदोलन पुन्हा उभारी घेत आहे. दडपण्याचा, बदनामीचा प्रयत्न शेतकऱ्यांनी उधळून लावला. ते पुढील रणनीती ठरवत असतानाच आता शार्जीलने असे बरळून भाजपला मुद्दा देणे कुणाच्या फायद्याचे? काय गैर आहे, जर असे म्हटले तर की एल्गारच्या विचारपीठावर काही असे छुपे वावरतात, जे स्वत:च्या बेजबाबदारपणाने भाजपलाच मुद्दा मिळवून देतात. भाजपचेच अप्रत्यक्षरीत्या हित साधतात. जास्त वाटेल, पण धर्मनिरपेक्षतेचा आव आणताना प्रत्यक्षात धर्मांध बकवास करून असे बेजबाबदार लोक भाजपसाठीच अनुकूूल वातावरण निर्मिती करतात.
बस झालं आता. असा दुटप्पीपणा खुपणाराच. नव्हे संताप यावा असाच. भाजप नेत्यांनी कारवाईची मागणी केली म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करण्याविषयी मागेपुढे पाहू नये. काँग्रेस असो की राष्ट्रवादी कुणालाही खुपेल असेच आहे शार्जीलचे बरळणे. अनेकांच्या तशा प्रतिक्रियाही वाचल्या. थेट कारवाई करा. जर कुणीही आडवं जरी आलं तरी पर्वा करू नका. धर्मांध धर्मांधच असतात. त्यातही पुन्हा ते जाणीवपूर्वक, ठरवून गरळ ओकत असतील, तर त्यांना जरब बसावी अशी कारवाई झालीच पाहिजे. तुम्ही फक्त मुख्यमंत्री नाही. तुम्ही मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आहात. हे दाखवून देण्याची, हीच ती वेळ!
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यम उपक्रमाचे मुख्य संपादक आहेत. संपर्क ९८३३७९४९६१)
कोळसे पाटील सारखी व्यक्ती जरूर कायदे पंडित असेल पण ती विचारवंत वगैरे नक्कीच नाही. ज्या व्यक्तीला मुळात विचार कसे मांडायचे हेच माहीत नसेल आणी हेतू डोक्यात ठेऊन धार्मिक टिप्पणी करत असेल तर ही व्यक्ती तृतीय श्रेणितली ठरते.
सर, मी एक पत्रकार आहे, भाजप वगळता सर्व पक्ष एकत्रित यावेत, या विचारांचा मी आहे, खरे तर काँग्रेस विचारांचे संस्कार माझ्यावर लहान असल्यापासून झाले, ते विचार आज ही कायम आहेत, पण एक प्रश्न मला कायम सतावतो, तो म्हणजे धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? हिंदू धर्मावर टीका करावयाची, हिंदूंवर टीका करायची म्हणजेच धर्मनिरपेक्षता का? आपले समाजवादी कायम असेच करत आलेत, त्यातूनच भाजप सारख्या पक्षांचे फावते, धर्मनिरपेक्षता याचा अर्थ कोणी कुणत्याही धर्माचा असो चूक ते चूकच असा अर्थ अपेक्षित असावा, मात्र, घडते उलटेच, सरसकट हिंदू धर्माला शिव्याशाप दिल्या की झाला धर्मनिरपेक्ष असा अर्थ निघतो, तो चुकच आहे, असे मला वाटते, चूक कोणत्याही धर्माची असो, जो त्या चुकीचा समाचार घेतो, तो धर्मनिरपेक्ष पण सध्या उलटेच घडतांना दिसते आहे बी. जी. कोळसे पाटील यांच्या उपस्थितीत हे घडत असेल तर हे आक्षेपार्ह व आपण म्हणता तसे भाजप ला शक्ती देणारेच आहे.
भोईटे साहेब
अचुक व डोळ्यात अंजन घालणार विश्लेशन