मुक्तपीठ टीम
पुणे सायबर पोलिसांनी महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांच्यासह आणखी काहींना अटक केली आहे. सुपेंच्या चौकशीनंतर पुणे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ८८ लाख रोख आणि सोनं मिळून ८९ लाखांचा ऐवज जप्त केला होता. मात्र, पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेंची आणखी चौकशी केली असता त्यांना पैसे लपवण्यात त्यांची मुलगी कोमल पाटील आणि जावई नितीन पाटील यांनी मदत केल्याचं समोर आलं. पुणे पोलिसांनी त्या दोघांना चौकशीला बोलावल्यानंतर छापा टाकून १ कोटी ५९ लाखांची रोख रक्कम आणि ७० लाखांचं सोनं जप्त केलं आहे. दरम्यान, परीक्षा आयुक्त सुखदेव डेरे, परीक्षा घेण्याचे कंत्राट मिळालेल्या जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार आणि संजय सानपला बीडमधून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची वाढती व्याप्ती आणि आर्थिक व्यवहार पाहता राज्य प्रशासनातील आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत धागेदोरे पोहचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे पोलिसांनी केली कसून चौकशी
तुकाराम सुपेंची मुलगी आणि जावई यांची चौकशी केल्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांच्या आळंदीमधल्या चऱ्होलीमधल्या घरावर छापा टाकला. यामध्ये पोलिसांना ९७ हजार रुपये आढळले. यानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा चौकशी केली. नितीन पाटील यांनी पैशांची बॅग त्याचा मित्र बिपीनच्या फ्लॅटवर ठेवल्याची कबुली दिली. यानंतर पुणे पोलिसांनी १ कोटी ५९ लाखांची रोख रक्कम आणि ७० लाखांचं सोनं जप्त केलं.
तुकाराम सुपेवर निलंबनाची कारवाई
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आलं आहे. त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय पुण्यातलं मुख्यालय सोडता येणार नाही, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
दरम्यान, टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी सायबर पोलिसांनी एकाला बीडमधून अटक केली आहे. बीडमधल्या पाटोद्यामध्ये राहणाऱ्या संजय शाहूराव सानप याचा या गुन्हयात सहभाग असल्याचं आढळल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. सायबर पोलिसांचे अटकसत्र सुरुच आहे.
परीक्षा आयुक्त सुखदेव डेरेला अटक
- टीईटी पेपर फुटी प्रकरणी परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे याला अटक झाली आहे.
- सुखदेव डेरे औरंगाबाद विभागीय बोर्डाचा अध्यक्ष होता.
- यापूर्वी डेरेला निलंबित करण्यात आले होते.
बंगळुरुतून परीक्षा कंपनीच्या संचालकाला अटक
- परीक्षा घेण्याचे कंत्राट मिळालेल्या जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला बंगळूरमधून अटक करण्यात आली आहे.
- पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणी थेट राज्याबाहेर कारवाई केली.
- या प्रकरणाचे धागेदोरे हे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताना दिसत आहेत.
- आश्विन कुमार हा २०१७मध्ये जी ए टेक्नॉलॉजीचा संचालक होता.
- प्रीतिश देशमुखचा हा वरिष्ठ होता.
संजय सानपला बीडमधून अटक
- टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात सायबर पोलिसांनी बीडच्या पाटोद्यामधील वगझरीतून संजय शाहूराव सानप याला अटक करण्यात आली.