मुक्तपीठ टीम
आरोग्य भरती परीक्षेपाठोपाठ म्हाडाच्या परीक्षेचाही पेपर फुटल्यानं विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. तसंच भाजपने यावरुन राज्य सरकारवर टीकेची झोडही उठवली. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ११ डिसेंबर रोजी मध्यरात्री सोशल मीडियावरुन दिलगिरी व्यक्त करत परीक्षा स्थगित केल्याची माहिती दिली होती. त्यानंतर रविवारी सकाळी पेपर फुटल्याचं प्रकरण समोर आलं होतं. आता आता म्हाडाकडून परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे.
कधी होणार म्हाडाची परीक्षा?
म्हाडा सरळसेवा भरती २०२१ साठी १२ डिसेंबर २०२१ ते २० डिसेंबर २०२१ दरम्यान ४ टप्प्यात परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, ११ डिसेंबर २०२१ रोजी भरती प्रक्रिया राबवण्यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीचे संचालक यांना सायबर पोलीस, पुणे यांनी म्हाडा सरळसेवा भरतीची प्रश्नपत्रिका फोडण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेतलं आणि अटक केली. या घटनेमुळे पात्र उमेदवारांवर अन्याय होऊ नये यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाने १२ डिसेंबर २०२१ ते २० डिसेंबर २०२१ दरम्यान ४ टप्प्यात घेण्यात येणारी परीक्षा तात्काळ रद्द केली. ही परीक्षा आता १ फेब्रुवारी २०२२ ते १५ फेब्रुवारी २०२२ दरम्यान होणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होईल. परीक्षेचं वेळापत्रक आणि इतर सूचना लवकरच म्हाडाच्या संकेतस्थळावरुन दिल्या जातील.
आता ‘म्हाडा’कडूनच परीक्षा होणार
खासगी संस्थांकडून परीक्षा घेण्यात येत असल्याने गोपनियतेचा भंग होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे यापुढे म्हाडाच सर्व परीक्षा घेणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचं आता घेतलेले शुल्क परत करण्यात येईल. शिवाय पुढील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही, अशी घोषणाही जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.
आव्हाडांकडूनच दिली गेली पेपर फुटीची माहिती
परीक्षा स्थगित करत असल्याचं सांगत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यात प्रश्नपत्रिकेबाबत एकाच व्यक्तीला माहित होतं. प्रश्नपत्रिका छपाईला गेल्यावर संबंधित कंपनीने त्या प्रश्नपत्रिका आपल्या ताब्यात ठेऊ नयेत, असे स्पष्ट नियम असतानाही या कंपनीच्या मालकाने सदर प्रश्नपत्रिका आपल्या ताब्यात ठेवली. त्याने गोपनियतेचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परीक्षेत काही गैरप्रकार होणार असल्याचा संशय आपल्याला याआधीच आला होता. त्यामुळेच आपण ३ दिवसांपूर्वीच गैरप्रकार आढळल्यास परीक्षा रद्द करण्याचा इशारा दिला होता, असं आव्हाड यांनी स्पष्ट केलं.