मुक्तपीठ टीम
पुण्यामध्ये मुलाने आंतरजातीय लग्न केल्याने त्याच्या कुटुंबावर बहिष्कार घातल्याचे सांगणाऱ्या जातपंचायतीमधील ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील दत्तवाडी पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जातपंचायतीने अरणेश्वर गवळीवाड्यातील मुक्तांगण शाळेच्या हॉलमध्ये एकत्र येत हा निर्णय घेतला होता.
याप्रकरणी महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण कायद्यांतर्गत अर्जुन रामचंद्र जानगवळी, हरीभाऊ हिरणवाळे, चंद्रकांत उर्फ बाळू औरंगे आणि त्यांच्या इतर दोन साथीदारांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गवळीवाडा, खडकीमध्ये राहणाऱ्या ६९ वर्षीय रामचंद्र भाऊसाहेब पंगुडवाले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
जात आणि जाच!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र भाऊसाहेब पंगुडवाले हे त्यांचे नातेवाईक संजय नायकू यांच्या मुलाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेले होते. त्या ठिकाणी उपस्थित असलेलया समाजातल्या पंचांनी फिर्यादी यांना तुमच्या मुलाने जातीच्या बाहेर लग्न केले आहे. त्यामुळे तुम्ही आता आमच्यात येऊ शकत नाही, असा फर्मान सोडला. तसंच आयोजकांना तुम्ही यांना का बोलावले आहे, हे जातीतून बहिष्कृत केलेले आहेत. असे म्हणत तिथून निघून जाण्यास सांगण्यात आले.