अपेक्षा सकपाळ
मराठी माणसाला, मराठी मनाला रोजची सकाळ प्रसन्न करणारे वासुदेव भावतातच. सकाळी साखरझोपेत वासुदेवाचा सुस्वर कानी आल्यावर जाग येण्याएवढं मोठं सुख कोणतं? सकाळची प्रसन्नता वाढवत गाव जागं करत येणारा हा वासुदेव. खेड्यापाड्यात फिरत, लहानग्यांना जागवत, लोकांचे रंजन करणाऱ्या वासुदेवाची परंपरा आता लोप पावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र आजही काही वासुदेव आपली परंपरा जपत आहेत. असेच एक वासुदेव बाबुराव गंगावणे हे मुंबईच्या उपनगरांमधील मराठी विभागांमध्ये फिरून आपली परंपरा राखतात.
मुक्तपीठशी बोलताना त्यांनी आपल्या परंपरेची माहिती दिली. आम्ही पुणे जिल्ह्यातील बारामतीच्या मेडध गावचे आहोत. पिढ्यानपिढ्या ही परंपरा पुढे नेत आहोत. आम्ही सकाळी सहापासून आपल्या पारंपरिक वेशात जनजागरणासाठी बाहेर पडतो. मी स्वत: गेली तीस वर्षे हे काम करत आहे. वयाच्या विशीपासून सुरुवात केली. मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा अशा सर्व ठिकाणी मी फिरत असतो.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे सर्वांसाठीच वाईट गेलीत. त्यामुळे अनेकजण आजही खचलेले दिसतात. पण वासुदेव बाबुराव गंगावणे मात्र म्हणाले, कोरोना हे मानव अवतारावरालाच त्रास आहे. त्यामुळे आम्हीही तो भोगला. चतकोर भाकरी खायचो. गावातच होतो. मंदिरेही बंद होती. आमच्यातील काही शेतीकाम करायचे. काही अन्य मोलमजुरी.
त्यांनी सरकारने वासुदेवांच्या समस्यांची दखल घ्यावी, अशी मागणी केली. विखुरलेले असल्याने मराठी परंपरा टिकवणाऱ्या वासुदेवांकडे म्हणावं तसं लक्ष दिलं जात नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
परंपरा वासुदेवांची…
घोळदार अंगरखा, डोक्यावर मोरपिसांची शंकूच्या आकाराची टोपी, पायात घुंगरू आणि कंबरेला तांबडा शेला आणि उजव्या हातात चिपळ्या आणि डाव्या हातात टाळ व बासरी घेऊन गाणं म्हणत नाच करत वासुदेव सकाळची प्रसन्नता वाढवायला येतो. वासुदेव आपल्या घरी आला की पूर्वीची लोकं भाग्याची गोष्ट मानत असे. कारण त्या रूपाने श्रीकृष्णचं आपल्या घरी आला असे वाटत होते. वासुदेव आला की लहान मुले आनंदात त्याच्या भोवती गिरकी घेत, महिला सुपातून धान्यदान करत व पुरुष माणसे पैसा देऊन त्याला नमस्कार करत.वासुदेवाचं रूप घेऊन दान पावलं म्हणत दान मागणारी परंपरा काळाच्या ओघात लुप्त होऊ पाहत आहे.
वासुदेवांचा इतिहास
- महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण समूह.
- मराठी परंपरा जपल्यामुळे ओळखले जातात.
- मराठा कुणबी समाजाप्रमाणेच त्यांचे रीतिरिवाज आहेत.
- आपली पारंपारिक धार्मिक गाणी गात ते सकाळी गाव जागवतात. लोक त्यांना जे देतात त्यावर ते उदरनिर्वाह करतात आणि
- घरातल्या मुलाला योग्य वेळी वासुदेव परंपरेची दीक्षाही समारंभपूर्वक दिली जाते.
- काही वासुदेव शेतीचा व्यवसायही करतात.
गावोगावी भरणाऱ्या जत्रांत वासुदेव दिसतात. काही लोक नदीच्या पात्रात उभे राहून वासुदेवाला दान देतात. वेगवेगळ्या वासुदेवांची हक्काची वेगवेगळी गावे असतात आणि त्या गावांत प्रत्येक वर्षी फेरी मारून ते दान घेतात. ज्या गावात त्यांचा हक्क नसतो, त्या गावात दान घेताना ते आपली मोरपिसांची टोपी घालीत नाहीत. वासुदेव देणाऱ्याला तो त्याच्या वाडवडिलांचे नाव विचारतो आणि त्यांची नावे घेऊन महाराष्ट्रातील विविध देवतांना व संतांना ते दान ‘दान पावलंऽ दान पावलंऽ’ असे एक गाणे म्हणून पोचते करतो. पंढरपूरचा ‘इट्टोबाराया’, कोंढणपुरची ‘तुक्काबाई’, जेजुरीचा ‘खंडोबा’, सासवडचा ‘सोपानदेव’, आळंदीचा ‘ग्यानुबादेव’, देहूचा ‘तुकारामबाबा’, शिंगणापुरचा ‘महादेव’, मुंगीपैठणातला ‘नाथमहाराज’ अशा सर्वांना वासुदेव दान पावल्याचे सांगतो. म्हणजे हे दान वासुदेवाच्या हातात पडत असले, तरी वासुदेवाची भावना ते दान देवदेवतांना व संतांना पोचविण्याची असते.
माहिती : मराठी विश्वकोश
पाहा व्हिडीओ: