मुक्तपीठ टीम
भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे बेळगाव येथील पश्चिम विभागीय कार्यालय दक्षिणेतील चेन्नई येथे हलविण्यात आले आहे. खरंतर बेळगावसह सीमाभागाच मराठी भाषिकांवर सुरु असलेल्या अन्याय अत्याचारामुळे त्या आयोगाची तेथे गरज जास्त आहे. ते पुन्हा बेळगावला आणावे यासाठी दिल्ली येथे बेळगाव मधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा नेत्यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेतली.
दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी भाषिक अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी याना पत्र लिहून याबाबत विचारणा केली असल्याचे समितीच्या युवा शिष्टमंडळाला कळविले आहे.
या सोबतच बेळगाव मध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर काही कानडी गुंडानी शाई फेकत जो भ्याड हल्ला केला त्या संदर्भात देशाच्या संसदेत आवाज उठवावा यासाठी बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते, पियुष हावळ , संतोष मंडलिक व धनंजय पाटील सध्या दिल्लीत दाखल झाले आहेत. ते महाराष्ट्रातील खासदारांच्या भेटी घेत आहेत. दिल्लीत त्यांनी आता पर्यंत खासदार अरविंद सावंत, संजय मंडलिक, डॉ. अमोल कोल्हे, धैर्यशिल् माने तसेंच राज्यसभा खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटी दरम्यान सीमाभागातील मराठी भाषिकांच्या संदर्भात वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली असता, भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे कार्यालय बेळगावमध्ये पुन्हा आणण्यास शरद पवार प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावरील हल्या विषयी शिवसेना व राष्ट्रवादीचे खासदार आवाज उठविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी समितीच्या युवा शिष्टमंडळाला सांगितले.