तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
एकीकडे पक्षबांधणीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे दौरे करत आहेत, तर दुसरीकडे मनसेचा चांगला प्रभाव असणाऱ्या पुण्यात मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे. त्या इंजिनातून उतरताच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी जन पळ भर म्हणतील हाय हाय…अशा काव्यंपक्ती मांडत काहीच फरक पडत नाही, असं सुचवणारं ट्वीट केलं. पण मुळात रुपाली पाटील यांच्यासारखे निष्ठावान आणि प्रभावशाली नेते का मनसे सोडतात, त्यावर मनसे पुन्हा उभारी घेत असताना राज ठाकरेंनी गंभीरतेनं विचार करावा, असे मत अनेक मनसैनिक व्यक्त करीत आहेत.
राज ठाकरेंनी शिवसेना सोडताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर श्रद्धा कायम असल्याचे सांगतानाच विठ्ठलाला बडव्यांचा वेढा पडल्याचा उल्लेख केला होता. पण आता नवं मंदिर स्थापणाऱ्या राज ठाकरे नावाच्या आमच्या विठ्ठलाही नव्या बडव्यांचा २००९पासून सातत्याने नव्या बडव्यांचा वेढा पडताना दिसतोय, अशी खंतही व्यक्त होताना दिसत आहे.
रुपाली पाटील यांनी मनसे सोडल्यानंतर पत्रकार परिषदेत मांडलेल्या भूमिकेतूनही बडव्यांबद्दलची खंत त्या स्पष्ट बोलल्या नसतील तरी व्यक्त झालीय. त्या म्हणाल्या, “माझ्या स्वार्थासाठी मी राज ठाकरे आणि मनसेचे कार्यकर्ते यांना वाईट बोलणार नाही. मनसेच्या काही नेत्यांसदर्भात मी पक्षाच्या चौकटीत राहून माझी अडचण राज ठाकरे यांना कळवली आहे. परंतु, काही कारणांमुळं मी राजीनामा देत आहे. लोकांना न्याय देत असताना खंबीर साथीची गरज असते, हे मी राज ठाकरे यांना कळवलं आहे. काही बाबतीत बदल घडत नसेल तर मला स्वत:मध्ये बदल घडवावा लागेल.”
राजकीय नेते पक्ष सोडताना अगदीच काही निस्वार्थी भावनेने सोडतात असं नाही. स्वार्थही असतोच असतो. पण तो सर्वांचाच असतो. मग तो शिखरापासून पायथ्यापर्यंत सर्वांचाच असतो. त्यामुळे रुपाली पाटलांनीही स्वत:ला खंबीर साथ मिळवण्यासाठीच मनसेची साथ सोडली आहे. त्या तसे म्हणाल्याही आहेत. पण त्या मानसिकतेत त्या का गेल्या, याचाही विचार आवश्यक वाटतो. रुपाली पाटील यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करतानाही राज ठाकरेंविषयी काढलेले उद्गार त्यांची मानसिक कोंडी मांडणारे आहेत.
राज ठाकरे हे नाव कायम ह्रदयात कोरलेलं राहिल…
- रुपाली पाटील यांनी राज ठाकरे यांना याबाबत लिहिले आहे, हे पत्र सध्या चर्चेत आहे.
- रुपाली पाटील यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं, “प्रेम जय महाराष्ट्र, मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे.
- आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत.
- यापुढेही आपले आशीर्वाद आणि मा. श्री.राज ठाकरे हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल.
जय महाराष्ट्र.”
पक्ष सोडतानाही नेतृत्वाला दोष न देता कायम श्रद्धाभाव व्यक्त करण्याची हमी खूप कमी नेते देतात. रुपाली पाटील तसे करताना दिसतात. तेव्हा स्वाभाविकच विचार केलाच पाहिजे. पुण्यातून मिळालेल्या माहितीनुसार पुण्याची जबाबदारी असणारे मनसेचे दोन पदाधिकारी रुपाली पाटलांविरोधात कागाळ्या करत असत. मुंबईतील नेत्यांच्या संपर्कात राहून ते पुण्यातील आपली काम करत असत. त्यात रुपाली पाटलांच्या आक्रमकतेमुळे अनेकदा त्यांना अडथळा वाटे. त्यातून रुपाली पाटलांसाठी अडचणीची स्थिती होईल, अशाच त्यांच्या हालचाली असत. पुणे शहर अध्यक्षपदी ज्येष्ठ नगरसेवर वसंत मोरे यांची निवड होण्यातही रुपाली पाटलांचा सहभाग होता. त्यामुळे ते दोन नेते अधिकच दुखावले गेले होते. मोरेंसारखा प्रभावी नेता अध्यक्षपदी आल्याने आपल्याला मनमानी करता येणार नाही, असेही त्या दोन नेत्यांना वाटू लागले होते. त्यातून रुपाली पाटलांच्या विरोधातील त्यांच्या कारवाया अधिकच वाढल्या होत्या. त्यामुळेच अखेर रुपाली पाटील यांनी त्यांच्या शब्दात सांगायचे तर “लोकांना न्याय देत असताना खंबीर साथीची गरज असते, हे मी राज ठाकरे यांना कळवलं आहे. काही बाबतीत बदल घडत नसेल तर मला स्वत:मध्ये बदल घडवावा लागेल.” अखेर साथ मिळत नसल्याने रुपाली पाटलांनी मनसे सोडली आहे. त्या स्वत:त बदल घडवत आहेत. पण असं पुन्हा घडू-बिघडू नये म्हणून मनसे स्वत: बडवेगिरी संपवणारे बदल घडवणार का?
तुळशीदास भोईटे हे ‘मुक्तपीठ’चे संपादक आहेत.
संपर्क – ट्वीटर @TulsidasBhoite मोबाइल 9833794961 ई-मेल tulsidasv@gmail.com