तुळशीदास भोईटे/सरळस्पष्ट
एकीकडे काशी विश्वनाथ धामाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असतानाच दुसरीकडे राजकीय हिंदुत्वातील फोलपणा दाखवण्याचं काम कर्नाटक सरकारच्या आशीर्वादाने कन्नड गुंड बेळगावात करत आहेत. काशी विश्वनाथ आपणा सर्व हिंदूंच्या महादेवाचं महाक्षेत्र! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या क्षेत्राचा कायाकल्प घडवला. त्याबद्दल त्यांना धन्यवादच! त्यांचं हिंदू म्हणूच नाही तर प्रत्येक भारतीयाने अभिनंदन केलंच पाहिजे. पण एकीकडे देवाधिपती, महादेवाच्या दर्शनासाठीचा कोंडलेला मार्ग मोदी रुंद करत असताना काहींची तथाकथित हिंदू मनं मात्र नाल्यासारखी अरुंद होताना दिसत आहे. तेही बदलण्याची गरज आहे.
एकीकडे काशीत हिंदू मनाला सुखावणारा सोहळा साजरा होत असताना दुसरीकडे देशात इतर ठिकाणी जे घडते त्यामुळे आता गरज सागरासारखा विशाल, अथांग हिंदू धर्म गटारासारख्या राजकारणात डुंबणाऱ्यांना समजवण्याची गरज आहे, असे तीव्रतेने वाटते.
तथाकथित हिंदुत्वाच्या पुरस्कर्त्यांकडून हिंदूंवरच अन्याय!
हिंदू एक व्हावेत, हिंदूंनी एकजुटीनं देव, देश, धर्मासाठी प्राण पणाला लावावेत, असे राजकीय हिंदुत्वाचे पुरस्कर्ते नेहमीच गर्जतात. त्यासाठी इस्लामी मूलतत्ववाद्यांच्या ‘इस्लाम खतरे में’ या बांगच्या स्टायलीत ‘हिंदू धोक्यात’ आल्याची हाळीही दिली जाते. पण जेव्हा काही हिंदूंवरच या राजकीय हिंदूत्वाच्या पुरस्कर्त्यांकडूनच अन्याय, अत्याचार होतात, तेव्हा मात्र शेपट्या घालून गप्प बसण्याचा षंढ मार्गच निवडला जातो. तेव्हा ते सारे थंड बसतात. हिंदू खरंच धोक्यात आलेले असूनही. आजही बेळगावात तसेच घडले!
सीमाभागात मराठी माणसांवर दडपशाही!
मराठी भाषिकांचा विरोध असतानाही कर्नाटक सरकारकडून गेल्या काही वर्षांपासून बेळगावात विधीमंडळाचे अधिवेशन घेतले जाते. कर्नाटकी दडपशाहीचा निषेध करण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे दरवर्षी भव्य मेळाव्याचे आयोजन केले जाते. २००४पर्यंत बेळगावाकडे कर्नाटक सरकारचे लक्षही नव्हते. पण एकीकरण समितीने सर्वोच्च न्यायालयात भक्कम पुरावे सादर करत कन्नड कब्जेबाजीला विरोध करताच कर्नाटक सरकारने बेळगावात विधानभवन बांधले. तेथे अधिवेशन घेण्यास सुरुवात केली. कन्नड साहित्य संमेलनालाही सुरुवात केली. त्याचवेळी मराठी कार्यक्रमांना परवानगी नाकारणे, दिली तरी त्यात अडथळे आणणाऱ्या कन्नड गुंडांना पाठिशी घालणे असे प्रकार सुरु झाले. तरीही मराठी माणसांनी कच न खाता विरोध करणे सुरुच ठेवले.
मराठी नेत्याला कन्नड गुंडांनी काळे फासले!
आजही महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे तसाच मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला परवानगी नाही असे सांगत रविवारपासूनच पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दादागिरी सुरू केल्याचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे पियूष ओहोळ यांनी सांगितले. मेळावा आयोजित करण्यात आलेल्या डेपो परिसरात पोलिस छावणीसारखेच स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच मेळाव्याला येण्यापासून मराठी कार्यकर्त्यांना रोखले जात आहे. तरीही मराठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने मेळाव्यासाठी जमले आहेत. बहुधा त्यामुळे बिथरलेल्या कन्नड रक्षक वेदेकेच्या गुंडांनी मेळाव्याच्या स्थानाजवळ पोलिसांच्या साक्षीने हैदोस घातला. महामेळाव्याच्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना बाजूला बोलवण्यात आले. तेथे पोलिसांच्या समोरच कन्नड रक्षक वेदिकेच्या मूठभर गुंडानी दळवींना काळे फासले. यामुळे संतापलेल्या सीमाभागातील मराठी जनतेनं मंगळवारी बेळगाव बंदचा निर्णय जाहीर केला आहे.
कर्नाटकात संविधानाचा भंग! स्वातंत्र्य धोक्यात!
कर्नाटकात मराठी भाषिकांचे माणूस म्हणून जगणेच धोक्यात आलेले आहे, त्यांना वाली कोणी नाही. तिथे कन्नडांचे वसाहती वसवून टक्काही घटवला जातो. त्यात आपले बोलभांड नेते फक्त निवडणूक पर्यटन करून परत येतात. सातत्यानं मराठी माणसांच्य पाठिशी नाही तर सोबत उभे राहावे तसे घडत नाही. उलट आपल्याकडे भाषिक अल्पसंख्यक म्हणून कन्नडांना वाट्टेल त्या सवलती मिळतात. तिथं मराठी माणसांना मराठी भाषा वापरणे, मराठीत शिकणे हे संविधानाने दिलेले अधिकारही वापरता येत नाहीत. निवडणुकीत यश मिळू नये यासाठी पैसा पेरा आणि माणसं फोडा, असे कपटी डाव खेळले जातात. आपले मराठी नेते मात्र फक्त पत्रक आणि बाइटबाजीच्या पलिकडे जात नाहीत.
आता कळेल कोण महाराष्ट्रद्रोही!
कर्नाटकात भारतीय संविधानाचा भंग होत आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांपासूनही मराठी माणसांना वंचित ठेवले जात आहे. त्यांचं भारतीय नागरिक म्हणून असलेले आचार, विचार स्वातंत्र्य धोक्यात आणलं जात आहे. मराठी माणसांच्या मानवाधिकारांचा भंग होत आहे. पण इतरवेळी महापुरुषांचा अपमान करणाऱ्या, बदनामी करणाऱ्यांच्या विचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्यांसाठी मराठी नेते सरसावतात. तेच नेते आता कर्नाटक सरकारच्या, कर्नाटक पोलिसांच्या आणि कन्नड पोलिसांच्या गुंडगिरी, दडपशाहीविरोधात काय भूमिका घेतात, ते महत्वाचे ठरणार आहे.
त्यातही लबाडी नको. प्रत्येक मराठी नेत्याने कर्नाटक सरकार, कन्नड पोलीस आणि कन्नड गुंड यांचा निषेध केलाच पाहिजे. जर तसे करण्यासाठी ते काहीही हातचं राखून करतील तर त्यांनाच महाराष्ट्रद्रोही म्हणावे लागेल. सर्व नेत्यांनी आता महाराष्ट्राशी, मराठी माणसांशी असलेलं इमान दाखवावं. उगाच अखिल भारतीय असल्याचा आव आणून कोणीही महाराष्ट्रद्रोह करू नये!