मुक्तपीठ टीम
सागरी कर्मचाऱ्यांची असामान्य नौकानयन कौशल्ये आणि धाडसाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी, आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेकडून (आयएमओ), स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या, समुद्रात इतरांचे जीव वाचवण्यासाठी असामान्य धाडस दाखवणाऱ्या किंवा सागरी पर्यावरणाला होणारे नुकसान टाळण्यासाठी किंवा ते कमी करण्याचे प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती किंवा समूहांना समुद्रातील असामान्य शौर्यासाठी दरवर्षी पुरस्कार प्रदान केला जातो.
यावर्षी, ज्वलनशील मालाने भरलेल्या आणि आग लागून किनाऱ्याकडे वाहून जात असलेल्या एम/टी न्यू डायमंड जहाजाच्या बचाव कार्यासाठी केलेल्या असामान्य आणि धाडसी प्रयत्नांसाठी टगबोट ओशन ब्लिसच्या प्रमुख खलाशी आणि चालक दल सदस्यांसह भारतीय नौदल तसेच भारतीय तटरक्षक दलाला आंतरराष्ट्रीय सागरी संघटना परिषदेने प्रशंसा प्रमाणपत्र प्रदान केले.
भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल तसेच टगबोट ओशन ब्लिसचे मुख्य खलाशी आणि चालक दलाच्या बचाव पथकातील सदस्यांनी अतिशय काळजीपूर्वक आणि प्रभावी अग्निशमन उपायांचा अवलंब करून ही मोहीम राबवली आणि कुशलतेने जहाज किनाऱ्यापासून दूर नेले, त्यामुळे समुद्रातील जीवितहानी टाळली आणि सागरी प्रदूषणाची गंभीर घटना टाळता आली.