मुक्तपीठ टीम
कोरोनात विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी महिला आयोग संवेदनशीलपणे प्रयत्न करणार असून वेगवेगळ्या मंत्रालयाच्या योजना या महिलांना मिळाव्यात यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
‘कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती’च्या सदस्यांसोबत त्यांनी झूम मीटिंग घेतली. त्या बैठकीत त्या बोलत होत्या. महाराष्ट्रात कोरोनात विधवा झालेल्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणे हा शासनाचा प्राधान्यक्रम असून त्यासाठी महिला विकास आर्थिक महामंडळाशी चर्चा करून त्यांच्या रोजगारासाठी योजना बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करू असे त्यांनी सांगितले.
‘कोरोना विधवा पुनर्वसन समिती’चे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करून या महिलांच्या विविध समस्या मांडल्या व इतर राज्य सरकारांनी जशी एकरकमी मदत केली तशी मदत महाराष्ट्र सरकारने करावी अशी विनंती केली. त्यानंतर जयाजी पाईकराव यांनी हॉस्पिटलने लूट केलेल्या कुटुंबांचे ऑडिट व्हावे यासाठी तक्रारी दाखल केली आहे त्याबाबत तातडीने सुनावणी होण्याची मागणी केली तर गडचिरोली च्या शुभदा देशमुख यांनी या महिलांच्या रोजगारासाठी काय करणे शक्य आहे याबाबत विविध मुद्दे मांडले. नांदेड चे अंकुश पाटील यांनी शासनाने विधवा महिलांसाठी स्थापन केलेल्या वात्सल्य समितीच्या बैठका होत नसल्याचे सांगून याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश द्यावेत अशी मागणी केली.
संजय गांधी निराधार योजनेतील अनेक त्रुटी नाशिक जिल्ह्यातील विद्या कसबे यांनी मांडल्या. ज्येष्ठ कार्यकर्त्या रेणुका कड यांनी महिलांच्या मालमत्ताविषयक अधिकार याबाबत शासनाने कायद्याची अंमलबजावणी करून पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त केली या सर्व मुद्द्यांवर रुपाली चाकणकर यांनी तपशीलवार प्रतिसाद दिला व त्याचबरोबर या सर्वच प्रश्नांवर संबंधित मंत्रालयाशी पत्रव्यवहार करून कार्यकर्त्यांसोबत बैठका आयोजित करणार असल्याचे सांगितले. या एकल महिलांच्या प्रश्नावर राज्य सरकार धोरण आणण्याचा प्रयत्न करत असल्याने महिला आयोग सकारात्मक भूमिका बजावेल असे त्यांनी सांगितले. बैठकीचे सूत्रसंचालन शंभूराजे यांनी केले.