मुक्तपीठ टीम
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाब लोक काँग्रेस पक्षाची स्थापना केली आहे. सोमवारी चंदीगडमध्ये पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. चंदीगडच्या सेक्टर ९ डी येथे असलेल्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी कॅप्टन स्वतः पोहोचले. दरम्यान, कॅप्टन यांनी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका भाजपासोबत लढण्याची घोषणा केली आहे. याबाबत आपण अमित शाह यांच्याशी बोललो असल्याचे अमरिंदर यांनी सांगितले.
पत्रकार परिषद घेत कॅप्टन यांनी सांगितले की,पंजाब विधानसभा निवडणूक जिंकण्याचे आमचे ध्येय आहे आणि आम्ही जिंकू. तत्पूर्वी त्यांनी पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करण्यापूर्वी वाहेगुरुजींचे आशीर्वाद घेतले. “कॅप्टन यांनी ट्वीट केले की, पंजाबच्या समृद्धीसाठी आणि सुरक्षिततेसाठी देवाकडे प्रार्थना करत आहे, कारण मी माझे राज्य आणि तेथील लोकांच्या कल्याणासाठी काम करत राहण्याचे वचन देतो,”
यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शह यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेस (पीएलसी) आणि टकसाली नेते सुखदेव सिंग धिंडसा यांच्या संयुक्त अकाली दलाशी युती करण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. कॅप्टन आणि धिंडसा यांच्याशी निवडणूक युती करण्याबाबत भाजपाच्या वतीने उघडपणे वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भाजपसोबत युती करून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे कॅप्टन यांनी आधीच सांगितले आहे.