मुक्तपीठ टीम
भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी शनिवारी सांगितले की, न्यायालयाची पायरी चढणे हा लोकांसाठी शेवटचा पर्याय असावा. ४० वर्षांहून अधिक काळ या व्यवसायात काम करत असल्यामुळे,माझा असा सल्ला आहे की, मध्यस्थी आणि लवादावर भर द्यावे.
हैदराबादमधील एका कार्यक्रमाला संबोधित करताना रमणा म्हणाले, मध्यस्थी आणि लवाद हा संबंध पूर्ववत करण्याचा प्रयत्न आहे. कोणत्याही वादाचे निराकरण करण्यामागील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे योग्य दृष्टिकोन. योग्य दृष्टिकोनातून मला असे म्हणायचे आहे की आपण आपला अहंकार, भावना, अधीरता सोडली पाहिजे. परंतु एकदा हे संघर्ष न्यायालयात दाखल झाले की, प्रक्रियेत बरेच काही वाया जाते.
संघर्षांशिवाय जगाची कल्पना करता येत नाही हे लक्षात घेऊन ते म्हणाले, लवाद आणि मध्यस्थी यांसारख्या यंत्रणा आजकाल विवाद सोडवण्याच्या पसंतीच्या पद्धती आहेत. यामुळे कमी विलंब, कमी खर्च, प्रक्रियेत पक्षांचा अधिक सहभाग, अधिक नियंत्रण, अधिक आरामदायी आणि सौहार्दपूर्ण वातावरण असे अनेक पटींनी फायदे मिळतात.
ते म्हणाले, भारतात काही लवाद केंद्रे असूनही, भारतीय पक्ष आंतरराष्ट्रीय लवादासाठी पॅरिस, सिंगापूर, हाँगकाँग, लंडन, न्यूयॉर्क आणि स्टॉकहोम या भारताबाहेरील लवाद केंद्रांची निवड करतात, ज्यासाठी मोठा खर्च येतो. हैदराबादमध्ये इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑर्बिटेशन अँड आर्बिट्रेशनच्या स्थापनेमुळे भारतात हा ट्रेंड बदलेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.