मुक्तपीठ टीम
आजची मन प्रसन्न करणारी सर्वात चांगली बातमी पुण्यातून आहे. एका रिक्षाचालकाच्या लेकीनं बुद्धिमत्ता आणि परिश्रमाच्या बळावर मिळवलेल्या २ कोटींच्या शिष्यवृत्तीची बातमी प्रेरणादायी आणि कुणालाही आनंद व्हावा अशीच आहे.
ऋतुजा भोईटे ही पुण्यामधील कोंढवा खुर्दमध्ये राहाते. तिचे वडील सामान्य रिक्षाचालक आहेत. ऋतुजाला अमेरिकेतील विद्यापीठाची दोन कोटींची शिष्यवृत्ती मिळाली आहे. कोंढवा ते अमेरिका असा तिचा प्रवास प्रेरणादायी आहे. याआधी दहावीनंतर दोन वर्षांच्या शिक्षणासाठी तिला थायलंडमधील विद्यापीठातून पन्नास लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली होती. अमेरिकेत ती आर्थिक व्यवस्थापन या विषयात पदवीचे शिक्षण घेणार आहे, या विषयातील शिक्षणासाठीच तिली ही शिष्यवृत्ती मिळाली आहे.
ऋतुजाचे प्राथमिक शिक्षण गावातीलच महानगर पालिकेच्या शाळेत झाले आहे. माध्यमिक शिक्षण तिने लवळे येथील अवसरा शाळेत पूर्ण केले. दहावीनंतर थायलंडमधील विद्यापीठात ती शिकत होती. आता तिला अमेरिकेतील विद्यापीठाची दोन कोटींची शिष्यवृत्ती मिळाल्याने ऋतुजा थायलंडवरुन थेट अमेरिकेला रवाना झाली आहे. पुढील चार वर्षासाठी तिला साधारणत: दर वर्षी ६५ हजार अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार ५० लाख रुपये मिळणार आहेत. अमेरिकेत ती आर्थिक व्यवस्थापन या विषयात पदवीचे शिक्षण घेणार आहे, या विषयातील शिक्षणासाठीच तिली ही शिष्यवृत्ती मिळाली आहे.
ऋतुजाचा मामा संताष खोडवे म्हणाले, “ऋतुजाच्या यशाचे आम्हाला कौतुक असून, अमेरिकेसारख्या देशात आमच्या घरातील एकही माणूस गेला नाही, तिथे ऋतुजा शिक्षणासाठी जात आहे याचा आम्हाला अभिमान आहे. तिचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून बाकी मुलीही यश संपादन करतील असा मला विश्वास वाटतो.”
ऋतुजाच्या वडिलांनी आता रिक्षासोबतच भाजीचा व्यवसायही सुरु केला आहे. आपल्या लेकीने कर्तृत्वाच्या बळावर नाव कमवल्याचा आनंद त्यांनी मुक्तपीठशी बोलताना व्यक्त केला. ऋतुजाचा भाऊ सध्या अकरावीत शिकतो आहे. आपल्या ताईनं मिळवलेलं यश प्रेरणादायी असल्याचं त्यानं अभिमानानं सांगितलं.
पाहा व्हिडीओ: