मुक्तपीठ टीम
बंगळुरुच्या येलाहंका विमानतळावर तीन ते पाच फेब्रुवारी दरम्यान एरो इंडिया आंतरराष्ट्रीय एअर शो होणार आहे. या शोमध्ये अमेरिकन बॉम्बर विमान बी -१ बी लान्सर झळकणार आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच डीआरडीओने आयोजित केलेल्या या एअर शोची हे १३ वे वर्ष आहे.
चेन्नई येथील अमेरिकन वाणिज्य दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान दक्षिण डकोटा येथील एल्सवर्थ एअरफोर्स बेसच्या २८ व्या विंगचा भाग आहे. लांब पल्ल्याच्या या सुपरसॉनिक विमानाने कायम तळापासून ते जगाच्या कानाकोपऱ्यात आपले अभियान पूर्ण केले आहे.
डॅन हेल्फिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या एअर शोमध्ये अमेरिकेचा सहभागामुळे दोन्ही देशाची संरक्षण भागिदारी मजबूत होत आहे. या शोमध्ये अमेरिकन विमान उड्डाण उद्योगाच्या प्रतिनिधींसह हेल्फीन उपस्थित राहणार आहेत.
एरो इंडिया शोच्या पार्श्वभूमीवर बेंगळुरू पोलिसांनी १ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान फुगे, ड्रोन आणि वैमानिकरहीत विमान उड्डाण करण्यास बंदी घातली आहे. बेंगळुरूचे पोलिस आयुक्त कमल पंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर शो दरम्यान १ ते ८ फेब्रुवारीदरम्यान फुगे, ड्रोन, यूएव्ही, क्वाडकॉप्टर, ग्लायडर इत्यादींवर उड्डाण करण्यास पूर्ण बंदी आहे.
पाहा व्हिडीओ: