मुक्तपीठ टीम
महिला सक्षमीकरण हे ध्येय आहे आणि सुरक्षितता हा त्यावरून जाण्याचा मार्ग असून सर्व क्षेत्रात महिलांचा ५० टक्के सहभाग असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.
स्त्री आधार केंद्रातर्फे जागतिक महिला हिंसाचार विरोधी दिनानिमित्त २५ नोव्हेंबर २०२१ ते १० डिसेंबर २०२१ या कालावधीत “महिला सक्षमीकरण व महिलांची सुरक्षितता ” या विषयावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचाच एक भाग म्हणुन आज दि. ४ डिसेंबर रोजी ‘ महिलांची सुरक्षितता व महिला सक्षमीकरण ‘ यांच्या अंतर्गत महिलांचे समुपदेशन ’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते, याप्रसंगी डॉ.गोऱ्हे बोलत होत्या.
महिला अत्याचाराच्या घटनाच्या बाबतीत बोलताना डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की, सर्व घटनांमध्ये तीन महत्वाचे मुद्दे लक्षात घेऊन त्यामध्ये बदल होणे आवश्यक आहे. त्यापैकी पहिला मुद्दा म्हणजे आपण स्त्रीचे म्हणणे ऐकायला शिकले पाहिजे.दुसरा मुद्दा म्हणजे स्त्रिया जेंव्हा अन्यायाबाबत सांगत असतात तेंव्हा या अन्यायाबाबत कोणत्या कायदयातून आधार मिळू शकतो ,याबाबत कोणकोणत्या उपाय योजना आहेत, याबाबत त्यांना माहिती देणे गरजेचे आहे.तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी आपण काय करू शकतो याबाबत विचार करणे .स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी बेल बजावो मोहीम,भरोसा सेल यांनी काय प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे ,याबाबत त्यांनी माहिती दिली.
२०३० पर्यंत सर्व क्षेत्रात ५०% महिला असाव्यात यादृष्टीने सर्व महिलांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे डॉ गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच या चर्चा सत्राचा समारोप दि १० डिसेंबर,२०२१ रोजी होईल.यामध्ये महाराष्ट्र शासनाचा नवीन शक्ती कायदा याबाबत चर्चा करण्यात येईल असे प्रतिपादन डॉ नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केले.
या चर्चासत्रात स्त्री आधार केंद्राच्या अपर्णा पाठक यांनी केशरी दिवस संस्कृती व कार्यपद्धती याबाबत माहिती दिली. रुक्मिणी गलांडे ,सहायक पोलिस आयुक्त,पुणे यांनीही स्त्री अत्याचाराच्या घटनांमध्ये पोलिसांची भूमिका ,महिलांचे हक्क याबाबत माहिती दिली.
वैशाली वढे,अनिता परदेशी,अंजली कुलकर्णी यांनी अनुभव कथन केले तर विभावरी कांबळे यांनी आभारप्रदर्शन केले.