मुक्तपीठ टीम
देशातील प्रतिष्ठेच्या ‘राष्ट्रीय लाडली मीडिया अँड ऍडव्हर्टायझिंग अवॉर्ड फॉर जेंडर सेन्सिटिव्हिटी’च्या ११व्या पुरस्कार सोहळ्याची घोषणा करण्यात आली आहे. स्त्री-पुरुष समानता, महिला हक्क, लिंगभेदाबाबत संवेदनाक्षम विषयांवर नाटक, पुस्तके, चित्रपट, मीडियाच्या माध्यमातून भाष्य करणाऱ्यांना ‘पॉप्युलेशन फर्स्ट’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. यंदा पद्मश्री नीलम मानसिंग चौधरी यांना ‘लाडली जीवनगौरव पुरस्कार’ प्राप्त झाला असून, अॅड. फ्लॅव्हिया अॅग्नेस यांना ‘लाडली जेंडर चॅम्पियन’ पुरस्कार मिळाला आहे. रविवार ५ डिसेंबरला ‘पॉप्युलेशन फर्स्ट’च्या www.youtube.com/laadli_PF या युट्युब पेजवर सायंकाळी ४:३० वाजल्यापासून सोहळ्याचे ऑनलाईन प्रक्षेपण होणार आहे. पत्रकार, लेखिका आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त मृणाल पांडे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असतील.
लिंग भेद, सामाजिक मर्यादा यांना आव्हान देत, तसेच खचून न जाता एक प्रेरणा स्त्रोत बनून केलेल्या कार्यासाठी पद्मश्री डॉ. नीलम चौधरी यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येत आहे. भारतीय स्त्रीवादी चळवळीतील दिग्गज गेल ओमवेद्ट, कमला भसीन आणि सोनल शुक्ला या दिवंगत मान्यवरांच्या स्मरणार्थ तसेच त्यांच्या कार्याचा गौरव करत देण्यात येणारा ‘लाडली जेंडर चॅम्पियन’ पुरस्कार अॅड. फ्लॅव्हिया अॅग्नेस यांना देण्यात येणार आहे. फ्लॅव्हिया या महिलांच्या हक्कांसाठी कार्य करणाऱ्या वकील आहेत. त्या स्वतः कौटुंबिक हिंसाचाराला सामोऱ्या गेल्या असून या अनुभवामुळे त्यांनी महिला न्याय हक्कासाठी कायदेशीर मार्गाने काम करण्यास सुरुवात केली.
Do not forget to login tomorrow at 4:30pm to celebrate our 11th edition National Laadli Media and Advertising Awards for Gender Sensitivity winners! #Laadli #LMAAGS2021 #GenderSensitivity @SriramHaridass @MrinalPande1 @UNFPAIndia @norwayinindia @NorwayAmbIndia @ALSharada pic.twitter.com/7CF8afXcHE
— Laadli (@Laadli_PF) December 4, 2021
ज्येष्ठ भारतीय पटकथा लेखिका, वेशभूषाकार, कला दिग्दर्शिका, कला समीक्षक शमा जैदी यांना ‘लाडली ऑफ सेंच्युरी’ पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांनी सत्यजित रे, श्याम बेनेगल आणि एम.एस.साथ्यु यांसारख्या दिग्गज निर्मात्यांसह काम केले आहे. उमराओ जान, गरम हवा, झुबेदा, मंडी आणि अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी कला दिग्दर्शिका म्हणून काम केले आहे. भारतीय चित्रपट दिग्दर्शिका आणि लेखिका तनुजा चंद्रा यांना ‘लाडली वुमन बिहाईंड द सिन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. पडद्यामागे कार्य करणाऱ्या महिलांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. तनुजा त्यांच्या महिला प्रधान चित्रपटांसाठी ओळखल्या जातात. त्यांचे ‘दुश्मन’ आणि ‘संघर्ष’ हे चित्रपट गाजले आहेत. त्यांनी यश चोप्रा यांच्या ‘दिल तो पागल है’ चित्रपटाच्या पटकथेसाठी सह लेखन केले आहे.
या प्रसंगी, ‘एकजूट थिएटर ग्रुप’ आणि ‘आरभी- द सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’द्वारे तरुण व्हायोलिन वादकांच्या समवेत सादरीकरण करण्यात येईल. यावेळी नॉर्वेजियन राजदूत हॅन्स जेकब फ्रायदेनलुंड आणि यूएनएफपीए इंडियाचे देश प्रतिनिधी श्रीराम हरिदास अतिथी म्हणून उपस्थित असतील.