मुक्तपीठ टीम
आपले हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. गोरगरिब गरजूंचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘ग्रामीण गृहनिर्माण योजने’ अंतर्गत सन २०२२ पर्यंत सर्वांना आवास देण्याचे शासनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे. पालघर जिल्ह्यात वाडा प्रमाणे ‘आशियाना घरकुल प्रकल्प’ स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने राबविल्यास राज्यातच नव्हे तर देशात पालघर जिल्हा मार्गदर्शक ठरेल असे कृषी मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत महा आवास अभियान ग्रामीण २०२१-२०२२ टप्पा- २ च्या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन मंत्रालयात करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कृषि मंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे होते. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा, पालघरच्या जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यासह उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सभापती, सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, प्रकल्प अधिकारी तसेच इतर कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.
दादाजी भुसे म्हणाले, सर्वांसाठी घरे २०२२ या संकल्पनेअंतर्गत महा आवास ग्रामीण अभियान राबविण्यात येत आहे. गरीब गरजूंची घरांची स्वप्ने पूर्ण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. गतवर्षी पालघर जिल्ह्यात महाआवास अभियान अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी झाली असून, टप्पा २ अंतर्गतही उत्तम कामगिरी होणे अपेक्षित आहे. जेणेकरून राज्यातच नव्हे तर देशातही पालघर जिल्हा मार्गदर्शक ठरेल असेही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
वाडा तालुक्यात आशियाना प्रकल्पाअंतर्गत घरे बांधण्यात आली. त्याचप्रमाणे पालघर येथेही गरजूंना घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. या गृहनिर्माण योजनेमध्ये स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, तंत्र शिक्षण संस्था यांचा सहभाग वाढवावा जेणेकरून घरांचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास सहकार्य लाभेल असेही दादाजी भुसे यांनी सांगितले.
गावपातळीवर एकत्र येऊन स्थानिक प्रदेशातील साहित्य घरबांधणीसाठी वापरल्यास चांगले घर तयार होऊ शकेल. ही घरे दीर्घकाळ टिकावी अशा गुणवत्तेची असावीत. ज्या गरजूंकडे जमिन नाही अशांना पंडीत दिनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत ५० हजारांचे अनुदान देण्यात येते. या अनुदानामध्ये वाढ करण्यासंदर्भात शासनस्तरावर सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील असेही मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. याचबरोबर बहुमजली गृहसंकुले, नवनवीन बांधकाम तंत्रज्ञान, सँड बँक वापरण्यात यावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. पहिल्या टप्प्यात उत्तम कामगिरी केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. ग्रामीण अभियंत्यांचे मानधन वाढविण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. या राज्यव्यापी गृहनिर्माण मोहिमेअंतर्गत पालघर जिल्हा अव्वल ठरेल अशा प्रकारचे काम होईल असा विश्वास पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.