मुक्तपीठ टीम
गडचिरोली म्हटलं की मागासलेला, दुर्गम आणि त्यामुळेच की काय नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांसाठी ओळखला जाणारा जिल्हा. पण गेली काही वर्षे निसर्गाचं वरदान लाभलेल्या या जिल्ह्याचा कलंक पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे.शिवसेनेचे नेते, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक अधिकाऱ्यांच्या बळावर वेगवेगळ्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले आहे. त्यातही जिल्ह्यातील स्थानिक पोलिसांच्या कल्याणकारी उपक्रमामुळे नक्षलवादी महिलांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या नेतृत्वाखाली नक्षलावादाच्या वणव्यातून आदिवासींना बाहेर काढण्यासाठी वेगळे प्रयत्न सुरु आहेत. अनेक नक्षलवादी महिलांनी मधल्या काळात आत्मसमर्पण केले होते. फिनाईल व्यवसायात सामील होऊन त्यांनी उद्योजिका ही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या क्लीन 100 या फिनेलचे नुकतेच लाँचिंग झाले. त्याचबरोबर कृषी पर्यटन, व्यवसाय प्रशिक्षण या मार्गानेही पोलीस वेगळे बदल घडवत आहेत. पोलिसांची ही गांधीगिरी कोणत्याही हिंसाचाराला शांततेत बदलणारी नक्कीच ठरेल.
पोलिसांच्या पुढाकाराने सकारात्मक बदल!
- गडचिरोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० महिला आणि एका पुरुषासह ११ माजी माओवाद्यांचा यात समावेश आहे.
- त्यांना फिनाईल बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते.
- त्यातुन त्यांनी आता स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.
- या फिनाईलचे ब्रँडचे नाव ‘क्लीन १०१’ आहे.
- गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या पुढाकाराने आत्मसमर्पण केलेल्या महिला नक्षलवाद्यांसाठी नवा उपक्रम सुरु करण्यात आला.
- त्यांच्या पुढाकाराने ‘नवजीवन उत्पादक संघ’ नावाचा स्वयंसहाय्यता गट सुरू करण्यात आला.
उत्तम दर्जाचे ‘क्लीन १०१’
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘क्लीन १०१’ फिनाईल अतिशय दर्जेदार असून त्याची किंमत इतर ब्रँडच्या तुलनेत खूपच कमी आहे.
- गडचिरोली पोलीस विभागाकडुन या बचत गटाला त्यांच्या उत्पादनाच्या विपणनासाठी मदत करण्यात येणार आहे.
- बचत गटाला विविध सरकारी आणि निमसरकारी विभागांकडून फिनाईलच्या ऑर्डरही प्राप्त झाल्या आहेत.
- महाराष्ट्रातील अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने २०० लिटर ‘क्लीन १०१’ फिनाइल स्वयंसहाय्यता गटांकडून खरेदी करण्याचा आदेश दिला आहे.
“शरणागती पत्करलेल्या नक्षलवादी महिलांना स्वयं-सहायता गटात संघटित करून वर्धा येथील एमजीआयआरआय येथे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांचे पहिले उत्पादन ‘क्लीन १०१’ फ्लोअर क्लीनर नुकतेच लाँच करण्यात आले. पहिल्या काही महिन्यांत आम्ही त्यांना मदत करू. सुरुवातीला मिळालेल्या फिनाईलच्या विक्री ऑर्डर्समुळे महिलांना खुप प्रोत्साहन मिळाले आहे”, असे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले.