मुक्तपीठ टीम
भारताने हिऱ्याला पैलू पाडण्यात आणि पॉलिशिंगमध्ये स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली आहे. भारत जगातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय हिरे व्यापार केंद्र बनू शकतो. चालू आर्थिक वर्षात पहिल्या ७ महिन्यांत ऑक्टोबरपर्यंत रत्ने आणि दागिन्यांची निर्यात २३.६२ अब्ज डॉलर्स होती. मागील वर्षी याच कालावधीत ११.६९ अब्ज डॉलर्स (+१०२.०९%) होती. आपल्या उत्पादकांच्या उत्कृष्ट गुणवत्तेमुळे आपण दुबई-यूएई, अमेरिका , रशिया, सिंगापूर, हाँगकाँग आणि लॅटिन अमेरिका सारख्या बाजारपेठांमध्ये विस्तार करू शकलो. भारत जगातील सर्वात मोठे हिरे व्यापार केंद्र म्हणून उदयाला येऊ शकतो, असे मत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केलंय.
गोयल म्हणाले की, सरकारने या क्षेत्राच्या वाढीसाठी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सुधारित सुवर्ण मुद्रीकरण योजना, सोन्याच्या आयात शुल्कात कपात आणि अनिवार्य हॉलमार्किंग यांसारख्या विविध उपाययोजना केल्या आहेत.
“आपल्याकडे जगातील सर्वोत्कृष्ट कारागीर आहेत , त्यांची सर्जनशीलता मजबूत करणे आणि कारागिरांच्या नियोजनबद्ध कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले, “नवीन बाजारपेठांमध्ये विस्तार आणि विद्यमान बाजारपेठांमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी आपण दर्जेदार उत्पादने बनवायला हवीत .” असेही गोयल यांनी सांगितले.
सुरतच्या दागिने निर्मिती संघटनेने (SJMA) आयोजित केलेल्या जेम्स अँड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग शो – २०२१ च्या उद्घाटन समारंभात दिलेल्या व्हिडिओ संदेशात गोयल यांनी सरकारने निर्यात प्रोत्साहनासाठी रत्ने आणि दागिने क्षेत्राची निवड केली असल्याचीही माहिती दिली.