मुक्तपीठ टीम
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी मुंबई, कोल्हापूर आणि धुळे नंदुरबारची निवडणूक बिनविरोध करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र नागपूर आणि अकोल्यात निवडणूक होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलढाणामध्ये विधान परिषदेच्या जागेसाठी थेट निवडणूक होणार आहे.
या उमेदवारांची बिनविरोध निवड
- मुंबईत भाजपचे राजहंस सिंह आणि शिवसेनेचे सुनील शिंदे
- कोल्हापुरात काँग्रेसचे सतेज पाटील
- धुळे-नंदुरबारमध्ये भाजपचे अमरिश पटेल
अशी झाली सतेज पाटलांची बिनविरोध निवड
- कोल्हापूर, धुळे-नंदुरबार, अकोला-बुलढाणा-वाशिम, नागपूर या प्रत्येकी एक आणि मुंबईच्या दोन अशा सहा जागांसाठी विधान परिषदेची
- निवडणूक जाहीर झाली. एकीकडे आरोप-प्रत्यारोप करणारे नेते दुसरीकडे मात्र निवडणुका बिनविरोध होण्यासाठी चर्चा करत आहेत.
- राज्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची आणि फडणवीस, पाटील यांच्यातही चर्चा सुरु होती.
- मुंबई आणि धुळे-नंदुरबारच्या बदल्यात काँग्रेसला कोल्हापूरची जागा देण्यावर एकमत झालं.
- त्यानंतर दुपारी दीड वाजता फडणवीस यांनी भाजप नेते धनंजय महाडिकांना फोन करुन भाजप उमेदवार अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यायला सांगितलं.
- पक्षादेश आल्यानं अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
- त्यामुळे कोल्हापुरातून काँग्रेस नेते सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
मुंबईत भाजप आणि शिवसेना उमेदवार विधान परिषदेवर बिनविरोध जाणार
- मुंबईतून भाजपने राजहंस सिंह यांना उमेदवारी दिली होती.
- तर शिवसेनेनं आदित्य ठाकरे यांच्यासाठी जागा सोडणाऱ्या सुनील शिंदे यांना विधान परिषदेसाठी संधी दिली आहे.
- मात्र, काँग्रेस नेते सुरेश कोपरकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्यानं मुंबईत निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
- मात्र, कोपरकर यांनी काल आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचे राजहंस सिंह आणि शिवसेनेचे सुनील शिंदेही विधान परिषदेवर बिनविरोध जाणार आहेत.
धुळे-नंदुरबारमध्ये अमरिश पटेल बिनविरोध
- धुळे-नंदुरबारमध्ये भाजपनं तगडा उमेदवार दिलाय.
- भाजपनं अमरिश पटेल यांना रिंगणात उतरवलं आहे. तर काँग्रेसकडून नवख्या गौरव वाणी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
- मात्र, धनंजय महाडिक यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई आणि धुळे-नंदुरबारच्या बदल्यात भाजपनं काँग्रेसला कोल्हापूरची जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
- त्यामुळे गौरव वाणी हे देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील हे स्पष्ट झालंय.
नागपुरात बावनकुळे विरुद्ध भोयर
- अकोला – बुलढाणा – वाशिममध्ये आघाडी व भाजपाला बहुमत नाही.
- भाजपाकडून नागपुरात बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न असताना काही काँग्रेस नेत्यांमुळे नागपुरात बिनविरोध निवडणूक होऊ शकली नाही.
- त्यामुळे नागपुरात आता माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांच्यात निवडणूक होणार आहे.
- तर अकोला – बुलढाणा – वाशिम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपाच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नाही.
- अकोला – बुलढाणा – वाशिम मतदारसंघातून शिवसेनेचे गोपीकिशन बजोरिया हे विद्यमान आमदार निवडणूक रिंगणात आहेत.
- त्यांच्याविरोधात भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तेथेही शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना होणार आहे.
निकाल स्पष्ट तिथं ठरलं, अटीतटीची तिथं बिघडलं!
- मुंबई मनपातील २ जागा, कोल्हापूर, नंदूरबार या चार जागी निकाल स्पष्ट असल्यानं तिथं आघाडी भाजपाचं झटकन ठरलं. तर नागपूर, अकोला-वाशिम-बुलडाण्यात अटीतटीची शक्यता असल्यानं तसंच राहिलं.