मुक्तपीठ टीम
देशातच नव्हे तर साऱ्या विश्वात कोरोनाने थैमान घातले होते. या विषाणूची दहशत सर्वत्र पसरली होती. एक अदृश्य शक्ती एक छोटासा जंतू साऱ्या विश्वात हाहांकार पसरवत होता. अशावेळी डॉक्टर, पोलीस अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार तसेच काही समाजसेवक रस्त्यावर उतरून या रोगाने बाधित असलेल्या लोकांची सेवा करत होते. यामुळेच आज आपण यशस्वीपणे या रोगावर मात करण्यास सफल झालो आहेत, असे ज्येष्ठ सिने अभिनेते धर्मेंद्र म्हणाले.
एकता मंच अंधेरी येथील एका सामाजिक संस्थेने कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांसाठी रस्त्यावर उतरून निस्वार्थीपणे जनतेची सेवा केली अशा या योद्धाचा यथोचित सन्मान केला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र उपस्थित होते.
सिने कलाकार पडद्यावरील जरी खरे असले तरी समाजातील खरे हिरो म्हणजे समाजात वावरणारे पोलीस आणि डॉक्टर व समाज सेवक आहेत. असे अभिनेते धर्मेंद्र यांनी सांगितले आणि डॉक्टर वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार यांनी केलेल्या कामाची प्रशंसा केली. कोरोनाच्या महामारीत गरजू लोकांना अन्नधान्य भाजी पाला पुरवणे, औषधांचा पुरवठा करणे, सँनिटेशन, मास्क व रुग्णांना ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून देणे औषध उपचार यासाठी आर्थिक मदत व वैद्यकीय सुविधा पुरवणे यासारखी अनेक कामे समाजातील तरुण आणि कोणत्याही निस्वार्थ भावनेने केली अशा वीरांना योद्धा म्हणून सन्मानित करण्याचे कार्य एकता मंचचे संस्थापक अजय कौल यांनी ठरवले.
अंधेरी मधील वर्सोवा यारी रोड येथील एका सभागृहात या कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये वैद्यकीय क्षैत्रातील नामवंत डॉक्टर पोलीस अधिकारी सफाई कर्मचारी ड्रायव्हर तसेच एनजीओ म्हणजे सामाजिक संस्था व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वर्सोवा गावात सतत नेहमी सामाजिक भान ठेवून लोकांना मदत करणारे चिल्ड्रन वेल्फेअर स्कूलचे प्राचार्य अजय कौल सरांचा गावकऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला याप्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्स्ना रासम, वरिष्ठ पोलीस अधिकारी सिराज इनामदार मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी विश्वास मोते शिवसेनेच्या नगरसेविका राजुल ताई पटेल ,नगरसेविका प्रतिभाताई कोकाटे आरोग्य समितीचे माजी अध्यक्ष शैलेश फणसे, या कार्यक्रमाचे नियोजन करणारे प्रशांत काशीद सर समाजातील विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुचिता पाटील आणि निकुंज पडाया यांनी उत्कृष्टपणे केले.