मुक्तपीठ टीम
अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरात चोरीसह घातक शस्त्रांचा धाक दाखवून लुटमार करणार्या दोन गुन्ह्यांचा ओशिवरा पोलिसांनी पर्दाफाश करुन अटक केली आहे. दानिश जमील खान आणि किशोरकुमार विजय मोहंती अशी या दोघांची नावे आहेत. यातील दानिश जिम ट्रेनर तर किशोरकुमार हा कास्टिंग कोऑरडिनेटर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी चोरीस गेलेला ५० हजार रुपयांचा लिओनो कंपनीचा लॅपटॉप, ८६ हजार रुपयांचा मोबाईल आणि गुन्ह्यांत वापरलेली बाईक जप्त केली आहे.
अटकेनंतर या दोघांनाही अंधेरीतील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अंधेरीतील ओशिवरा, ट्विकंल अपार्टमेटच्या शॉप क्रमांक आठमध्ये स्टाईल नावाचे एक दुकान आहे. याच दुकानात जगदीश जेतू वन हा २७ वर्षांचा तरुण कामाला आहे. गुरुवारी २८ जानेवारीला जगदीश हा नेहमीप्रमाणे दुकानात आला होता. कामात व्यस्त असतानाच सायंकाळी सहा वाजता या दुकानात एक तरुण आला. काही कळण्यापूर्वीच या तरुणाने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याच्याकडील ८६ हजार रुपयांचा सॅमसंग कंपनीचा महागडा मोबाईल घेऊन तो तरुण पळून गेला. या घटनेनंतर जगदीशने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिसांनी ३९२ भादवी सहकलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बेंडाळे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक रघुनाथ कदम, पोलीस उपनिरीक्षक तुषार सावंत, पोलीस हवालदार बागवे, साटम, पोलीस शिपाई माने, बारसिंग, शेख, सोयंके, सकपाळ यांनी तपासाला सुरुवात केली होती. तांत्रिक माहितीवरुन या पथकाने अंधेरी येथे संशयास्पद फिरणार्या दानिश याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यांतील मोबाईलसह एक बाईक पोलिसांनी जप्त केली आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या बारा तासांत पोलिसांनी दानिशला शिताफीने अटक केली.
पोलीस तपासात दानिश हा अंधेरीतील व्ही. एम रोड, जीवन रचना अपार्टमेंटच्या ए/५ मध्ये राहत असून जिम ट्रेनर म्हणून कामाला आहे. दुसर्या घटनेत ओशिवरा पोलिसांनी किशोरकुमार विजय मोहंती या कास्टिंग कोऑरडिनेटरला चोरीच्या गुन्ह्यांत अटक केली. कुशल विश्वनाथ कुलकर्णी हे २२ जानेवारीला रात्री त्यांच्या जोगेश्वरीतील ओशिवरा, न्यू लिंक रोडच्या रॉक्सी स्टुडिओमध्ये काम करीत होते. रात्री पाऊण ते दोनच्या सुमारास त्यांचा ५० हजार रुपयांचा एक लॅपटॉप अज्ञात चोरट्याने पळविला होता. हा प्रकार नंतर निदर्शनास येताच त्यांनी चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध ३८० भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बेंडाळे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक रघुनाथ कदम, पोलीस उपनिरीक्षक तुषार सावंत, पोलीस हवालदार बागवे, साटम, पोलीस शिपाई माने, बारसिंग, शेख, सोयंके, सकपाळ हे तपास करीत होते. हा तपास सुरु असतानाच या गुन्ह्यांतील आरोपी वडाळा येथील बरकत अली दर्गा रोड, केरबा मिठागर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवून किशोरकुमारला अटक केली. चौकशीत त्यानेच हा लॅपटॉप चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी चोरीचा लॅपटॉप जप्त केला आहे. तर किशोरकुमार हा वडाळा परिसरात राहत असून सध्या कास्टिंग कोऑरडिनेटर म्हणून काम करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.