तुळशीदास भोईटे / सरळ-स्पष्ट
“स्वातंत्र्य जर भीक म्हणून मिळाली तर ते स्वातंत्र्य कसे असू शकते? तुम्हीच सांगा. जर जर तुम्हाला त्यांनी युद्ध करून गुलामीत लोटलेले तर स्वातंत्र्य तुम्हाला भीक म्हणून कशी मिळू शकते?”
महान विचारवंत, पद्मश्री पुरस्कार लाभार्थी कंगनाजी राणौत सारख्यांचे असे दिव्य ज्ञान ऐकल्यानंतर खरं तर काही लिहावं, बोलावं असं वाटलं नव्हतं. त्याचं कमी की काय, वयानं वाढलेल्या विद्वान नेते सलमान खुर्शिद यांनीही त्यांच्या साठी ओलांडलेल्या बुद्धी नाठीचं दर्शन घडवलं. त्यांना आयसिस, बोको हराम या दहशतवादी सघटनांशी हिंदुत्वाच्या तुलनेची उबळ आली.
तरीही वाटलेलं सध्याच्या काळात वाट्टेल ते करा पण चर्चेत या, या मार्केटिंग फंड्यानुसार हे सारे बरळत असतात. दुर्लक्ष केलेलंच बरं, असं वाटलं होतं. पण स्वत:ला सेक्युलर किंवा हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्यांच्या बौद्धीक झुंडगिरीनंतर आता रस्त्यावर तशीच जमावाची झुंडगिरी सुरु झाल्याने त्यावर लिहावं लागतंय.
कंगना राणौतांचा सडका मेंदू
कंगना राणौत या चांगल्या अभिनेत्री आहेत. मात्र, आजवर त्यांची चित्रपटसृष्टीतील कारकीर्द ही त्यांच्या अभिनय गुणांपेक्षा पडद्याबाहेरील डायलॉगबाजीमुळेच गाजत आली. अर्थात तो त्यांचा अधिकार. पण व्यक्तिस्वातंत्र्य तुम्हाला जसं असतं तसं दुसऱ्यांनाही असतं. त्यामुळे तेवढी मर्यादा पाळलीच पाहिजे. पण कंगणा आणि मर्यादा याचा दुरान्वयानेही संबंध असावा असं दिसत नाही. त्यातून त्या कधी मुंबईला पाकिस्तानने बळकावलेल्या काश्मीरची उपमा देतात तर कधी आणखी काहीही बरळून लक्ष वेधून घेतात. आता त्या जे बरळल्यात ते जास्तच घातक. त्यांना १९४७मध्ये सर्वच राजकीय सामाजिक विचारांच्या स्वातंत्र्यसैनिकांनी (त्यातील हजारोंनी प्राणांचंही बलिदान केलं आहे) लढलेल्या स्वातंत्र्य लढ्यानंतर स्वातंत्र्य मिळवलं, ती भीक वाटते. सैन्यही जेव्हा विरोधात जाऊ लागलं तेव्हा ब्रिटिशांना पळताभुई झाली. तरीही सडक्या मेदूतून ते स्वातंत्र्य मिळवलेले नसून भीकेत मिळवले असल्याची विकृत फसफस बाहेर येते, हे नवं नाही. तेव्हा तो वेडेपणा नसून ठरवलेला कट असावा असंही भविष्यात बाहेर आलं तर आश्चर्य वाटायला नको.
कंगनापेक्षा टाळ्या वाजवणाऱ्यांची लाज वाटते!
भाजपाला या कंगणांचा खूप पुळका आहे. आजही चंद्रकांत पाटील म्हणालेत की त्यांना २०१४ आधी मोकळा श्वास घेता येत नसावा, म्हणून त्यांनी २०१४मध्ये स्वातंत्र्य मिळालं असं म्हणाल्या असाव्यात. पण त्यांनी १९४७बद्दल बोलायला नको होते, असंही ते म्हणाले. ही अशी कंगणासारख्यांची वकिली करणे म्हणजे लाचारीचा कळस आहे. खरंतर राजकीय स्वार्थ म्हणून असं बोललं जात असेल तर जरा कंगनाच्या राज्यातील हिमाचलमधील आताच्या पोटनिवडणुकांमध्ये काय घडले ते तरी पाहा. तिथं सर्व जागी भाजपाचा पराभव आणि काँग्रेसचा विजय झाला आहे. एका जागी तर भाजपाची अमानत रक्कमही जप्त झाली. ज्या पद्मश्री लाभार्थींच्या दिव्य ज्ञानाचा तुम्हाला त्यांच्या गृहराज्यात लाभ होत नसेल तर इतर ठिकाणी तुम्ही कसे त्यांचे लाभार्थी होणार?
हे असेच कंगनानं जिथं दिव्यज्ञान पाजळलं तो एका टीव्ही चॅनेलचा कार्यक्रम होता. तिथं त्या बोलत असताना उपस्थित सुटा-बुटातील हायप्रोफाइल क्राऊडनं टाळ्याही वाजवल्या. रस्त्यावर कारण नसताना स्वत:चाही जीव धोक्यात घालत हिंसाचार करणारा जमाव आणि हा क्राऊड काहीवेळा सारखाच वाटतो. स्वत:चं डोकं न वापरणारा. अँकर मॅडमनेही कंगनाला स्वातंत्र्याबद्दल प्रश्न विचारला नाही. हे सारे मेंढरांचे कळपच! पाहिजे तसे हाका!!
खुर्शिदांचे सुलेमानी किडे!
मी जन्मानं कर्मानं मुंबईकर. मुंबईत एखादा विनाकारण कळ काढत असेल, नको ते चाळे करत असेल तर त्याच्यात सुलेमानी, रहेमानी किडे आहेत, असे म्हटलं जातं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिंद. जन्म १९५३चा. म्हणजे साठी कधीच ओलांडलेली. पण त्यांच्या डोक्यात भलतेच सुलेमानी किडे वळवळत असल्याचे त्यांनी नुकतेच दाखवले. काहींना धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदूत्वाला शिव्या असंच वाटतं.
अशा अतिविद्वानांमुळेच धर्मनिरपेक्षवाद हा समाजातील मोठ्या वर्गात बदनाम शब्द झाला. मुळात मुसलमानांनाही आवडणार नाही तेवढे हे हिंदुत्वाविरोधात कडवट वागतात. मग त्यातूनच खुर्शिदांनी त्यांच्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना आयसिसशी केली असावी. पुन्हा अशा अतिविद्वानांमुळेही ते ज्या विचारांशी बांधिलकी सांगतात त्यांचा किंवा ज्या पक्षाच्या बळावर ते मिरवतात त्यांचा काडीचाही फायदा होतो का? तर नाही असेच दिसते. सलमान खुर्शिद उत्तरप्रदेशातील. त्यांचा उमेदीचा काळ हा त्यांच्या काँग्रेस पक्षासाठी उतरणीचा काळ ठरला. काय स्थिती आहे तेथे ते दिसत आहेच. कंगनाच्या हिमाचलमध्ये या पोटनिवडणुकीत भाजपाची यावेळी जी स्थिती झाली तशी खुर्शिदांच्या उत्तरप्रदेशात हाताची वाताहात गेली काही दशके कायमच आहे.
गरज नसताना अशी वक्तव्यं, असे लिखाण करणे म्हणजे राजकीय हिंदुत्ववाद्यांना दारुगोळा पुरवण्यासारखेच. तेही एकवेळ खपवून घेतलं जाऊ शकतं. कारण तो पुन्हा त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग. पण स्वातंत्र्य स्वैराचारात बदलू लागतं आणि धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरून धर्मांधतेचा स्वैराचार करू लागते तेव्हा तो टरकावणं भाग असतं. कारण अशा भंपकांमुळे, त्यांच्या स्वार्थासाठी केल्या जाणाऱ्या जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य, लिखाणामुळे समाजात तणाव निर्माण होतो. सामान्य समाज घटकांच्या मनात किल्मिष तयार होते. ही सुद्धा एक प्रकारे बुद्धीउन्मतांची बौद्धीक झुंडगिरीच!
गल्लीबोळातील धर्मांधाची झुंडगिरी!
समाजाच्या वरच्या थरात असलेली तथाकथित डोकेबाज मंडळी जे विष पेरतात तेच नंतर खाली झिरपतं. त्रिपुरात घडलेल्या कथित घटनेची प्रतिक्रिया देण्यासाठी महाराष्ट्रात मालेगाव, भिवंडी, अमरावतीत निदर्शने झाली. मुसलमान समाजाची निदर्शने म्हटली की ती हिंसकच का होतात, यावर आता तरी त्या समाजातील जाणत्यांनी विचार करावा. मुळात निदर्शनांची गरज नव्हती. कारण तुम्हाला जर त्रिपुरातील कथित घटना खुपत असतील, त्यासाठी महाराष्ट्रातील सामान्य माणसांचे नुकसान करावेसे वाटत असेल तर बांगलादेशात हिंदूवर झालेल्या हिंसाचाराचा मुद्दा घेऊन कुणी रस्त्यावर आलं तर त्यांना चुकीचे ठरवण्याचा हक्क तुम्ही गमावलेला असेल. भान राखा. त्यामुळे मुसलमान समाजातील हिंसाचार करणाऱ्या या अप्रवृत्तीमुळे सातत्यानं संपूर्ण मुसलमान समाज बदनाम होतो, या भावनेतून तरी जाणत्या मुसलमान नेते-कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न केलेच पाहिजेत. अर्थात तसाच प्रयत्न हिंदू समाजातही गरजेचा आहेच. त्यासाठी धर्मनिरपेक्ष विचारांच्या हिंदू नेते कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे.
नेत्यांचे हात वर, कार्यकर्ते आरोपी!
मुसलमान समाजाच्या नावाखाली झालेल्या हिंसाचारानंतर अमरावतीत आज हिंसाचार उफाळला. कालच भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी जी अतिआक्रमक प्रतिक्रिया दिली होती, तेव्हाच लक्षात आलेलं की अमरावती शनिवारी काही शांत राहणार नाही. झालं तसंच. सकाळीच मोठा जमाव अमरावतीत फिरू लागला. पुन्हा भाजपाच्या एका स्थानिक नेत्याचे बोलणे ऐकून १९९३ आठवले. अयोध्येतील बाबरी मशिद पाडल्यावर भाजपा नेत्यांनी हात वर केले होते. आजही तो स्थानिक नेता म्हणाला हिंसाचार आमचं कुणी करत नाही. बिचारे कार्यकर्ते. टीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चेहरे टिपले गेलेत. टीव्ही ९ च्या गजानन उमाटेंसारखे पत्रकार दंगलखोरांच्या हातातील दगड, काठ्या, त्यांचा हिंसाचार दाखवत होते. प्राणाची पर्वा न करता कर्तव्य बजावत होते. तरीही त्यांच्याच कॅमेऱ्यासमोर नेते मात्र जबाबदारी झटकत कार्यकर्त्यांवर सारं ढकलत त्यांना बेवारस आरोपी बनवण्याची तजविज करत होते.
पोलिसांचे कौतुक, पण आधी दक्षता का नाही?
त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटू शकतील याची कल्पना राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नव्हती तर आश्चर्यच वाटेल. गुप्तचर खाते काय करतंय? जर माहिती होती तर अशा पॉकेटमध्ये कमाल बंदोबस्त ठेऊन काल मुसलमान समाजातील काहींची निदर्शने टाळणे अशक्य नव्हतं. त्यांना हिंसाचाराची संधीच कशी मिळू दिली गेली?
त्यानंतर भाजपा नेत्यांच्या आक्रस्ताळ्या भाषेनंतर तरी जागे होणे गरजेचे नव्हते? अमरावतीत हजारो दंगलखोरांना रोखण्यासाठी आधी फक्त मूठभर पोलीस कसे? एक महिला पोलीस अधिकारी आणि दुसरे काही पोलीस अधिकारी, पोलीस शिपाई यांनी दंगलखोरांना रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तासाभराने इतर पोलीस दिसले. फौजफाटा वाढला. लाठीमार होताच जमाव पांगला.
महाराष्ट्रातील झुंडगिरी ठेचा!
व्यक्तिस्वातंत्र्य, त्यातून विचार-आचार स्वातंत्र्य असावेच असावे. पण स्वातंत्र्य जर स्वैराचारात बदलत असेल तर तसं होऊ देऊ नये. कारण झुंडगिरी ही बाधतेच बाधते. ती अनेकदा स्वातंत्र्याच्या नावाखाली दुसऱ्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेत असते. त्यामुळे झुंडगिरी खपवून घेतली जाऊ नये. झुंडगिरी मग ती बुध्दीउन्मतांची असेल किंवा गल्लीबोळातील. ती कुणाचीही असो, वेळीच ठेचणे गरजेचे आहे.
अपेक्षा आहे महाराष्ट्रातील सत्तेतीलच नाही तर विरोधातील नेतेही जबाबदारीनं वागतील. सत्ता येते जाते. पण राजकारणासाठी झुंडगिरी करू नका. खपवूनही घेऊ नका. झुंडगिरी ठेचाच ठेचा!
(तुळशीदास भोईटे हे मुक्तपीठ या मुक्त माध्यम उपक्रमाचे संपादक आहेत.)
संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite