मुक्तपीठ टीम
लार्सन अँड टुब्रो कंपनीला ‘द ला सेन्टीनेल समूह’ या प्रतिष्ठित मॉरिशियन मीडिया हाउसच्या टॉप १०० कंपन्यांच्या यादीत पहिले स्थान मिळाले आहे. ला सेन्टीनेलने डीसीडीएम रिसर्च कंपनीच्या सहकार्याने तयार केलेल्या बांधकाम क्षेत्राच्या टॉप १०० कंपन्यांच्या यादीत स्थान मिळेणे प्रतिष्ठेचे मानले जाते. त्या यादीत भारतीय कंपनीने पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. गेल्या १० वर्षांपासून टॉप १०० कंपन्या मॉरिशियसच्या व्यावसायिक क्षमता दर्शवत आहेत.
२६ किलोमीटरचा आणि पोर्ट लुईस व क्युरपाइप यांना १९ स्थानकांसह जोडणारा मॉरिशियस मेट्रो एक्सप्रेस प्रकल्प पूर्ण करून एल अँड टीने हा सन्मान मिळवला आहे. या मेट्रोचा जवळपास १५ किमीचा पट्टा – पोर्ट लुईस ते क्वात्रे बोर्न्स यापूर्वीच पूर्ण झाला असून ५ दशलक्षांपेक्षा जास्त प्रवाशांसह त्याचा यशस्वी व्यावसायिक वापर सुरू आहे.
यातील इतर कंपन्यांमध्ये युनायटेड बसाल्ट्स प्रॉडक्ट्स लि. (यूबीपी) आणि आफ्रिकन वंशांच्या इतर ५३ कंपन्यांचा समावेश आहे. त्याशिवाय एल अँड टीने मॉरिशियनची ४२ अब्ज रुपये सामाईक उलाढाल तयार केली असून मार्च २०२० मध्ये २.३ अब्ज रुपये नफा मिळवून दिला आहे.
मॉरिशियस मेट्रो एक्सप्रेसचा पहिला टप्पा – पोर्ट लुईस ते रोझ हिलचे उद्घाटन नरेंद्र मोदी आणि श्री. प्रविंद जगन्नाथ, अनुक्रमे भारत व मॉरिशसचे पंतप्रधान यांनी केले होते. दुसरा टप्पा ए – रोझ हिल ते क्वात्रे बोर्न्सची – सुरुवात यंदा मार्च महिन्यात झाली होती. दुसरा टप्पा बी – क्वात्रे बोर्न्स ते क्युरपाइपचे कामकाज डिसेंबर २०२२ पासून सुरू होणार आहे.
एल अँड टीला मेट्रो एक्सप्रेसच्या रोझ हिल ते रेड्युइट, इबेन सायबरसिटी मार्गे या विस्तारित कामाचेही कंत्राट मिळाले आहे. त्याची सुरुवात २०२२ च्या अखेरपासून होणार आहे.
लार्सन अँड टुब्रोची अभिमानास्पद पार्श्वभूमी
लार्सन अँड टुब्रो ही भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी असून ईपीसी प्रकल्प, उच्च तंत्रज्ञान उत्पादन आणि सेवा क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनी जगभरातील ५० देशांत कार्यरत आहे. दमदार, ग्राहककेंद्री दृष्टीकोन आणि उच्च दर्जाचा सातत्यपूर्ण ध्यास यांमुळे एल अँड टी गेल्या आठ दशकांपासून प्रमुख व्यवसायांमध्ये आघाडीचे स्थान टिकवून आहे.