मुक्तपीठ टीम
“शासन, करदाता आणि कर सल्लागार यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे वस्तू आणि सेवा कर संकलन चांगले होत आहे. प्रामाणिक करदाता अर्थव्यवस्थेचा कणा, तर कर सल्लागार हा शासन आणि करदाता यांना जोडणारा दुवा आहे. त्यांच्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था सक्षम होत आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.
महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (एमटीपीए), ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स (एआयएफटीपी), गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (जीएसटीपीएएम) आणि नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (एनएमटीपीए) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एआयएफटीपी’च्या ४५ व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आयोजित ‘ज्ञानसंगम २०२१’ या दोन दिवसीय राष्ट्रीय कर परिषदेचे उद्घाटन डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते झाले.
अमनोरा फर्न क्लब येथे झालेल्या या परिषदेवेळी ‘क्रेडाई’चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, परिषदेचे चेअरमन नरेंद्र सोनवणे, ‘एआयएफटीपी’चे एम. श्रीनिवासा राव, ‘एमटीपीए’चे अध्यक्ष मनोज चितळीकर, एस. एस. सत्यनारायण, मुख्य सहसमन्वयक शरद सूर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी सीए योगेश इंगळे लिखित ‘जीएसटी शास्त्र’, स्वप्नील शाह लिखित ‘जीएसटी ऑन सर्व्हिस सेक्टर’ व सीए वैशाली खर्डे लिखित ‘अ प्रॅक्टिकल गाईड ऑन जीएसटी ऍक्ट’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन कराड यांच्या हस्ते झाले. वृंदावन शहा व जयरामन यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तत्पूर्वी मंथन सत्रात ‘कनॉन्स ऑफ जस्टीस : सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, टॅक्स ट्रिब्युनल’वर मुंबईतील ऍड. लक्ष्मीकुमारण, ‘रोल ऑफ अलाइड लॉज इन इंटरप्रेटेशन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ जीएसटी लॉ’वर दिल्ली येथील ऍड. जे. के. मित्तल आणि जयपूर येथील ऍड. पंकज घिया, तर मानसिक तणाव यावर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मार्गदर्शन केले. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.
डॉ. भागवत कराड म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार सर्वांगीण विकासाचे ध्येय घेऊन शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचावी, याचा प्रयत्न करत आहेत. विकासाच्या योजना राबविण्यात कर हा घटक महत्वाचा असून, कर प्रणालीतील त्रुटी दूर करण्यासाठी कर सल्लागारांनी सूचना पाठवाव्यात. अर्थ मंत्रालयाकडून कर प्रणालीत सुसूत्रता आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. कोरोनानंतर अर्थसाखळी पूर्ववत होत आहे. लोकांमध्ये डिजिटल आर्थिक व्यवहार, अर्थ साक्षरता आणि आर्थिक सर्वसमावेशकता या तीन गोष्टींवर काम करायला हवे. डिजिटल अर्थव्यवहारात वाढ झाली, तर प्रामाणिकता आणखी वाढेल.”
सतीश मगर म्हणाले, “कर प्रणालीत मोठे बदल होताहेत. पण कर भरताना काही अडचणी येतात. जीएसटीमुळे बांधकाम क्षेत्राला, तसेच ग्राहकांनाही फटका बसला आहे. कोरोनानंतर पुन्हा एकदा अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहेत. या प्रणालीत सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न करावेत. व्यवसाय नीटपणे करता यावा, यासाठी अर्थ मंत्रालयाचा पुढाकार महत्वाचा आहे.”
श्रीनिवासा राव यांनीही मनोगत व्यक्त केले. नरेंद्र सोनवणे यांनी स्वागत प्रस्ताविक केले. अनुज चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. शरद सूर्यवंशी यांनी आभार मानले.