मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या संकटामुळे इतर क्षेत्रांप्रमाणे चित्रपटसृष्टीलाही मोठा फटका बसला. सिनेमागृह बंद असल्याने अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित करण्यात आले. परंतु आता हळूहळू सर्व गोष्टी पूर्वपदावर येत असताना, सिनेमागृह उघडण्यास देखील परवानगी मिळाली आहे. दीड वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर प्रेक्षक सिनेमागृहात कडे वळतील का असा प्रश्न सर्वांना पडला होता. परंतु अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ प्रेक्षकांना सिनेमागृहांकडे आकर्षित करण्यात यशस्वी झाला आहे. इतकेच नाही तर सूर्यवंशी लवकरच १०० कोटी बॉक्स ऑफिस कलेक्शनचा टप्पा पूर्ण करणार आहे.
पोलिसांचे कथानक असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी केले आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. तरण आदर्श यांच्या ट्विटनुसार, पहिल्याच दिवशी चित्रपटाने २६ कोटी रुपये कमवले. दुसऱ्या दिवशी २३.८५ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी २६.९४ आणि चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी १४.५१ कोटी रुपये कमवले. लवकरच चित्रपट १०० कोटींचा आकडा गाठेल अशी सर्वांना अपेक्षा आहे.
सूर्यवंशी या मल्टिस्टारर चित्रपटाला सिनेमागृहात ५० टक्के क्षमतेचे निर्बंध असून देखील, महाराष्ट्र आणि गुजरात मधील परीक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. दिल्ली आणि पूर्व पंजाब मधील प्रेक्षकांकडून कमी प्रतिसाद दिसुन आला आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित इतर अनेक चित्रपटांना देखील तेथून असाच प्रतिसाद मिळाला आहे.
सूर्यवंशी मागच्या वर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. सूर्यवंशी चित्रपटगृहातच प्रदर्शित करण्याच्या रोहित शेट्टी यांच्या निर्णयाचे सर्वजण कौतुक करत आहेत. यासाठी त्यांना २ वर्ष वाट पाहावी लागली. रेडा लिस्ट तरुण आदर्श यांच्या नुसार केसरी, हाउसफुल ४, गुड न्यूज या अक्षय कुमारच्या चित्रपटांपेक्षा सूर्यवंशी उत्तम ट्रेंड करत आहे. या चित्रपटाने युएस बॉक्स ऑफिसवर १६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.