मुक्तपीठ टीम
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याही अडचणीत वाढ झाली आहे. खंडणीप्रकरणी स्टेट सीआयडीच्या पथकाने महाराष्ट्र पोलिसांच्या दोन पोलीस निरीक्षकांना अटक करण्यात आली आहे. सायंकाळी दोघांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने दोघांना अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, परमबीर सिंग खंडणी प्रकरणात राज्य सरकारने SIT स्थापन केली होती. या समितीने केलेल्या चौकशी दरम्यान पुरावे आढळून आले होते. त्यानंतर स्टेट सीआयडीने दोन पोलीस निरीक्षकांना अटक केली आहे. तपास पथकाने महाराष्ट्र पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळ आणि आशा कोरके या दोघा पोलीस निरीक्षकांना वसुली प्रकरणातील सहभागाबद्दल चौकशीसाठी बोलावले होते.
अनेक तास चाललेल्या चौकशीनंतर सायंकाळी उशिरा दोघांना अटक करण्यात आली. तपास पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, चौकशीदरम्यान दोघेही समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. खंडणी प्रकरणात काही महत्त्वाची माहिती मिळावी यासाठी तपास पथक दोघांचाही रिमांड घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
- बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर २२ जुलै रोजी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंग, अकबर पठाण यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत शिंदे, संजय पाटील, निरीक्षक आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, बांधकाम व्यावसायिक सुनील जैन आणि संजय पुनमिया यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- या प्रकरणात सुनील जैन आणि संजय पुनमिया यांना याआधी पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती.
- मात्र काही दिवसांनी या गुन्ह्याचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या सीआयडी पथकाकडे वर्ग करण्यात आला.
- गुन्हा दाखल होताच यातील आरोपी पोलिसांची इतरत्र बदली करण्यात आली होती.
- जवळपास चार महिन्यांच्या तपासानंतर सीआयडीने पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके या दोघांना अटक केली.
- परमबीर सिंग यांच्यावरील गुन्ह्यांमध्ये दोन पोलीस निरीक्षकांना अटक झाल्यामुळे पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे.