मुक्तपीठ टीम
आदिवासी भागातील महिलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. रोटरी सोबो मुंबई, फिक्की फ्लो मुंबई चॅप्टर, फिक्की फ्लो पुणे चॅप्टर या समविचारी संस्थांच्या सहकार्याने पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील आदिवासी महिलांसाठी मधमाशी पालन उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या वतीने मधमाशी पालन व्यवसायासाठी १० दिवसांचे प्रशिक्षण व ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. मोखाडा गटातील वाघ्याची वाडी गावातील एकूण ४६ महिलांना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच वाघ्याचीवाडी तालुका मोखाडा येथे झाले. यावेळी खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या जिल्हा प्रमुख नेहा देवरुखकर, विभाग अधिकारी वसंत चौधरी, फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या चेअरपर्सन उषा पुनावाला, गायत्री तिवारी, नैना कानल, पूजा छेडा, रोटरी सोबो मुंबईचे अध्यक्ष राजीव पुनातर, आंतरराष्ट्रीय सेवा संचालक एल्स रेमायर्स, खजिनदार शीतल इदनानी, फिक्की फ्लो मुंबईच्या चेअरपर्सन लुबिना शाहपूरवाला, तहमीना खांडवाला, मोगूल दोरदी, खुशनुमा खान, मुकुल माधव फाउंडेशनचे बबलू मोकळे, यास्मिन शेख,आदी उपस्थित होते.
मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “मधमाशी पालनातून पालघर जिल्ह्यातील महिला उद्योजिका बनतील. या उपक्रमामुळे महिलांमधील सामाजिक-आर्थिक बदलांसह मधमाशांचे संवर्धन आणि स्थानिक जैवविविधतेचा समतोल साधला जाईल. महिलांना सक्षम, शिक्षित, रोजगारक्षम व स्वयंपूर्ण बनवण्यासह शाश्वत पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल. महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग महामंडळ या महिलांना प्रशिक्षण व उद्योग सुरु करण्यासाठी ५० टक्के अनुदान देणार आहे. तसेच संकलित मध खरेदी करण्यासाठी सहकार्य करणार आहे.”
उषा पुनावाला म्हणाल्या, “या समविचारी संस्था एकत्र आल्याने पालघर जिल्ह्यातील आदिवासींसाठी विविध प्रकल्प राबविता येतील. राजीव पुनातर यांनी आनंद व्यक्त करत या उपक्रमामुळे या भागातील लोकांचा विकास होईल, असा विश्वास व्यक्त केला आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाऊंडेशनला धन्यवाद दिले. या मधमाशी पालन उपक्रमामुळे येथील महिलांचे आयुष्य बदलून जाईल आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यात मदत होईल, असे लुबिना शहापूरवाला यांनी नमूद केले.