मुक्तपीठ टीम
मुंबईची रेल्वे म्हणजे लाइफ लाइन म्हणजेच जीवन रेखा. पण मुंबईकरांच्या जगण्यातील अविभाज्य भाग असणारी रेल्वेच त्यांच्यासाठी प्राणघातकही ठरते. अनेकदा सततच्या घाईत मुंबईकर प्रवाशी धोका ओढवून घेतात. काही वेळा दुर्लक्ष नडतं आणि जीव धोक्यात जातो. अशा वेळी आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वे पोलीस आणि आरपीएफचे जवान कामगिरी बजावतात. या जवानांनी गेल्या तीन वर्षात १२० प्रवाशांचे जीव वाचवले आहेत.
मुंबई उपनगरीय लोकल सेवेतील रेल्वे पोलिसांचे तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे म्हणजेच आरपीएफचे जवान सतत रेल्वे मार्ग आणि रेल्वे फलाटांवर दक्ष हजर असतात. त्यांच्या दक्षतेमुळे गेल्या तीन वर्षांत १२० प्रवाशांचे प्राण वाचवणारे जीवदाते ठरले आहेत. रेल्वे पोलीस दल (आरपीएफ) १११ आणि सरकारी रेल्वे पोलीस (जीआरपी) कर्मचाऱ्यांनी अपघातातून नऊ जणांची सुटका केली आहे. या प्रशंसनीय कार्यात नऊ पोलीस जखमीही झाले.
मुंबईच्या धावत्या जीवनाच्या वेळापत्रकात प्रत्येकाला कामावर वेळेत पोहचण्याची घाई असते आणि या कारणामुळे बरेच लोक धावती ट्रेन पकडतात. परंतु यामुळे रेल्वे अपघात होतात. काही लोक रेल्वे लोकलखाली ट्रॅकवर जातात, काहींचे हात पाय फ्रॅक्चर होतात आणि कधीकधी मृत्यूला देखील सामोरे जावे लागते. अशा घटना जवळपास रोजच घडतात, जेव्हा लोक धावती ट्रेन पकडण्याच्या भानगडीत पडतात. गेल्या तीन वर्षांपासून अशा घटनांची नोंद ठेवली जात आहे. बहुतांश घटनांमध्ये रेल्वे पोलिस कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता प्रवाशांना वाचवण्यासाठी उडी मारतात. अशा घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद होत आहेत.
आत्तापर्यंत चार लोकांचे प्राण वाचवणाऱ्या आरपीएफच्या महिला उपनिरीक्षक कविता साहू यांनी कल्याण रेल्वे स्थानकावर कर्तव्य बजावताना २०२० मध्ये तीन आणि या वर्षी एप्रिलमध्ये एका व्यक्तीचा जीव वाचवला. त्यांच्यासारख्या रेल्वे जवानांच्या शौर्याला मुक्तपीठचा सलाम!