मुक्तपीठ टीम
दिवाळी सणाच्या एक दिवसाअगोदरच लाखो बँक कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. ८ लाखांहून अधिक बँक कर्मचाऱ्यांना आणि इतर कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. हा महागाई भत्ता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी २०२१ साठी आहे. विशेष म्हणजे यावेळी महागाई भत्ता ३०.३८ टक्क्यांवर गेला आहे.
इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) च्या आदेशानुसार, यावेळी महागाई भत्यात ३७ स्तरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या वेळी ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरसाठी ३० स्तरांमध्ये वाढ करण्यात आली होती. एआयएसीपीआय (ऑल इंडिया अॅव्हरेज कंझ्युमर प्राइस इंडेक्स) डेटा जाहीर झाल्यानंतर ही वाढ झाली आहे.
आयबीएनुसार, औद्योगिक कामगारांसाठी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरसाठी एआयएसीपीआय सरासरी ८०८८.०४ आहे. यामुळे महागाई भत्ता ३९७ स्तरावरून ४३४ स्तरापर्यंत वाढतो. आयबीएच्या मते, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२१ साठी डीए ३९७ स्तर होता. यामुळे त्यात ३७ स्तराची वाढ झाली आहे. म्हणजेच त्यांचा महागाई भत्ता ३०.३८ टक्के झाला आहे. त्यानुसार सरकारी बँक कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता ३ टक्क्यांहून अधिक वाढला आहे.
महागाई भत्याची गणना
- महागाई भत्ता ८०८८.०४ — ६३५२= १७३६.०४/४ = ४३४ स्तर
- शेवटच्या तिमाहीत स्तर : ४३४
- महागाई भत्त्यात वाढ = ४३४-३९७ = ३७ स्तर (३०.३८%)
इतका वाढणार पगार
- आयबीएच्या एचआर विभागाचे वरिष्ठ सल्लागार ब्रिजेश्वर शर्मा यांच्या मते, सरकारी बँकेत काम करणाऱ्या प्रोबेशनरी ऑफिसरचा मासिक पगार ४० ते ४२ हजार रुपये आहे.
- वरिष्ठ सल्लागार ब्रिजेश्वर शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची बेसिक दरमहा सुमारे २७,६२० रुपये आहे.
- महागाई भत्त्यात ३ टक्क्यांहून अधिक वाढ केल्यास पगारावर परिणाम होईल.
- वरिष्ठ सल्लागार ब्रिजेश्वर शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, बँक पीओला संपूर्ण सेवेदरम्यान ४ वेतनवाढ देखील मिळते.
- बढतीनंतर कमाल मूळ वेतन ४२०२० रुपयांपर्यंत जाते.