मुक्तपीठ टीम
देश-विदेशातील अनेक बेरोजगार तरुणांची नोकरीच्या नावाने फसवणुक करणार्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा मुंबई पोलिसांच्या सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पुण्यात वास्तव्यास असलेल्या या टोळीच्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यातील तीनजण नायजेरीयन नागरिक तर एकजण पश्चिम आफ्रिकन नागरिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ओजुनसाकीन ऊर्फ मायकेल ओलायेनी, सोटोमिवा थॉम्सन, ओपेयेमी ओडेले ओगुन्मोरटी आणि ऑगस्टीन फ्रॉन्सिस विल्यम अशी चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने आतापर्यंत अनेक बेरोजगार तरुणांकडून नोकरीसाठी सुमारे दहा कोटी रुपये घेतल्याचे उघडकीस आले असून त्यांचे भारतासह दुबईत ६६ हून अधिक बँक खती आहेत. त्यापैकी अकरा बँक खाती सील करण्यात आली असून उर्वरित बँक खाती लवकरच सील करण्यात येणार आहे.
विशाल कृष्णा मांडवकर हा तरुण चेंबूर येथील साईबाबा मंदिराजवळील कोकणनगर, चेंबूर कॅम्पच्या नवजीवन सहकारी सोसायटीमध्ये राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्याला विदेशात नोकरी करण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते. या प्रयत्नात असताना तो विविध नोकरीविषयक वेबसाईटची नेहमीच पाहणी करीत होता. याच दरम्यान त्याला कॅनडा येथील एका नामांकित हॉटेलमध्ये नोकरी भरती सुरु असल्याची जाहिरात वाचण्यात आली होती. या जाहिरातीमध्ये एक मेलआयडी दिला होता. त्याने या मेलवर त्याचा बायोडेटा पाठविला असता त्याला संबंधित हॉटेलमधून एक पत्र आले होते. त्यात त्याला हॉटेलमध्ये नोकरी लागली आहे असे नमूद केले होते. त्यात त्याला मार्क ब्राऊन या व्यक्तीला ८४८९१५२८० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितला. त्यांला संपर्क साधल्यानंतर त्याला व्हिजा फी, प्रोग्राम फी, एम्लॉयमेंट ऑथरायझेशन, बेसिग ट्रॅव्हलिंग अलाऊन्स फी अशी वेगवेगळे कारण सांगून विविध बँक खात्यात पैसे भरण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. विदेशात नोकरी आणि चांगला पगार मिळत असल्याने विशालने कुठलीही शहानिशा न करता त्याने दिलेल्या बँक खात्यात १७ लाख २२ हजार ८०० इतकी रक्कम जमा केली होती. मात्र दिलेल्या मुदतीत त्याचा व्हिसा आला नव्हता, तसेच पुढील काहीच प्रक्रिया झाली नव्हती. त्यामुळे विशालने सायबर सेल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात ठगाविरुद्ध ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ भादवी सहकलम ६६ क, ६६ ड आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.
गुन्हा दाखल होताच सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त विरेश प्रभू, पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक एस. एस सहस्त्रबुद्धे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुनिल पाटील, निलेश यशवंतराव, पोलीस नाईक सावंत, पोलीस शिपाई जाधव, पिसाळ, तावडे, ननावरे यांनी तपासाला सुरुवात केली होती. तपासात या गुन्ह्यांत काही विदेशी विशेषता नायजेरीय नागरिकांचा सहभाग उघडकीस आला होता. संबंधित विदेशी नागरिक पुण्यातील उंड्री परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती प्राप्त होताच या पथकाने या चारही आरोपींना अटक केली. तपासात यातील तीन नायजेरीयन तर एक सिएरा लिओन या पश्चिम आफ्रिकन देशाचा नागरिक असल्याचे उघडकीस आले. या आरोपींकडून पोलिसांनी चौदा मोबाईल फोन, चार लॅपटॉप, तीन मेमरी कार्ड, पाच राऊटर, एक डेटा कार्ड, एक पेन ड्राईव्ह, दोन आंतरराष्ट्रीय क्रमांकासह चार सिमकार्ड आणि इतर संगणकीय साहित्य जप्त केले. अशा प्रकारे फसवणुक करणारी ही एक आंतरराष्ट्रीय टोळी असून या टोळीने फसवणुकीसाठी भारतातील बारा बँकेत ६४ बँक खाते उघडली होती. या बँक खात्यात महाराष्ट्र, दिल्ली, कोलकाता, ओरिसा, उत्तर प्रदेश, आसाम राज्यातील अनेक तरुणांनी नोकरीसाठी पैसे जमा केल्याचे दिसून आले आहे. त्यापैकी अकरा बँक खात्याची माहिती काढण्यात आली असून त्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाले आहेत. संबंधित सर्व बँक खाती गोठविण्यात आली आहेत. त्यांच्याकडे दोन विदेशी बँक खाते असून त्यातील एक बँक दुबईतील आहे. ते दोन्ही बँक खाती गोठविण्याची कायदेशीर प्रकिया सुरु आहे. या टोळीने नोकरीसाठी मोठ्या प्रमाणात बोगस दस्तावेज बनविली होती. आतापर्यंत २७ हजार संभाव्य बळीतांचा डेटा पोलिसांना प्राप्त झाला असून ही माहिती त्यांच्या लॅपटॉपमध्ये आहे. त्यात विदेशी बेरोजगार तरुणांचा समावेश आहे. त्यांनी आतापर्यंत ४८ देशातील तरुणांशी संपर्क साधला होता. देशभरात त्यांनी आतापर्यंत दोन हजार तरुणांना संपर्क साधल्याचेही तपासात उघडकीस आले आहे. या व्यक्तिरिक्त अडीच हजार तरुणांचा पासपोर्टचा डेटा आणि इतर गोपनीय माहिती सापडली असून त्याचा वापर त्यांनी कोणत्या कारणासाठी केला होता याचा तपशील घेण्याचे काम सुरु आहे. या टोळीच्या बँक खात्यात आतापर्यंत दहा कोटी रुपयांची रक्कम वळती करण्यात आली आहे. ही टोळी बेटींग आणि विविध डेटींग साईटचा वापर करीत होती असेही तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत ते चौघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे, या चौकशीतून जास्तीत जास्त माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.