मुक्तपीठ टीम
मुंबईकरांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता दोन लस घेऊन १५ दिवस झालेल्यांना लोकलचं तिकीट मिळणार आहे. या संदर्भातील पत्रही राज्य सरकारने रेल्वे बोर्डाला लिहिले आहे. राज्य सरकारने फक्त मासिक पास देण्याचे आदेश मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिले होते. मात्र त्यामुळे गेले काही दिवस प्रचंड गोंधळ आणि संताप बघायला मिळाला होता. मात्र, आता लोकलचं दैनंदिन तिकीट नागरिकांना मिळणार आहे.
- अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ दोन लस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासास परवानगी देण्यात आली होती.
- आतापर्यंत ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत आणि त्याला १४ दिवस पूर्ण झाले आहेत त्यांना तिकीटाऐवजी मासिक पास घ्यावा लागत होता.
- पण आता राज्य सरकारने दोन्ही डोस घेतलेल्या नागिरकांना दैनंदिन तिकीट मिळावे यासंदर्भातील निर्णय घेतला आहे.
- राज्य शासनाने रेल्वेला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त कर्मचारी रेल्वे स्थानकावर तैनात करावेत. तसेच लसीचे दोन्ही डोस घेतलेले नागरीकच पास किंवा तिकीट घेत आहेत का याबाबतची तबपासणी करावी.
१८ वर्षाखालील आणि मेडिकल कन्डिशनमुळे लस घेऊ शकले नसणाऱ्यांसाठी नियमावली
- १८ वर्षाच्या आतील मुलांना आणि काही मेडिकल कन्डिशनमुळे लस घेऊ शकले नसणाऱ्या नागरिकांना १५ ऑक्टोबरपासून रेल्वे प्रवासासाठी पास दिला जाऊ लागला आहे.
- १८ वर्षाखालील मुलांना प्रवासाच्या वेळी ओळखपत्र सोबत बाळगावे लागणार.
- यासंदर्भात राज्य सरकारने केलेल्या सूचनेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने या मुलांना लोकल प्रवासासाठी पास देण्याचा निर्णय घेतला होता.
- यामुळं १८ वर्षांखालील मुलांनाही लोकल प्रवास करता येणार आहे.
- तसेच काही महत्वाच्या मेडिकल कन्डिशनमुळे ज्या लोकांना लस घेता येत नाही अशांनाही रेल्वे प्रवासासाठी पास मिळणार आहे.
अशा लोकांनी पास काढतेवेळी तसं डॉक्टरांचं प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे.