मुक्तपीठ टीम
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुलींच्या प्रगतीबाबत केलेले वक्तव्य हे निषेधार्ह असून या विधानातून त्यांच्या बुरसटलेल्या मनुवादी विचारसणीचे दर्शन होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिलांबद्दलची चुल आणि मुल ही शिकवणच राज्यपाल महोदयांच्या मुखातून बाहेर आली असून राज्यपाल कोश्यारी यांनी या असंवेदनशील आणि बेजबाबदार वक्तव्याबद्दल देशातील मुली व महिलांची माफी मागितली पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
राज्यपालांच्या विधानाचा समाचार घेताना लोंढे पुढे म्हणाले की, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना काही मार्गदर्शन करणे अपेक्षित होते. परंतु संघाच्या शिक्षणामुळे महिलांबाबतची संघाची मतंच त्यांच्या बोलण्यातून बाहेर आली. महिलांबद्दल संघाची मतं सर्वश्रुत आहेत. मनुस्मृतीला माननारे हे लोक महिलांची प्रगती पाहू शकत नाहीत हेच राज्यपाल महोदयांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. मुली शिकून अशाच प्रगती करत राहिल्या तर २० ते ३० वर्षानंतर देशात आयएएसमध्ये मुलांपेक्षा मुली जास्त संख्येने दिसतील त्यासाठी बॅलन्स साधण्याचे प्रयत्न करा, असे म्हणणे हा बुरसटलेल्या मनुवादी पुरुषसत्ताक मानसिकतेचा प्रकार आहे.
मुलींनी प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या हिंमतीने त्या कुठेही कमी नाहीत हे सिद्ध करुन दाखवले आहे. देशाचे पंतप्रधानपद, राष्ट्रपतीपद, राज्यपालपद, न्यायाधिशांच्या पदावरही महिलांनी काम करुन त्या पुरुषांपेक्षा कशातही मागे नाहीत हे दाखवून दिले आहे. महिला जर प्रगती करत असतील तर त्यावर आक्षेप घेण्याचे कारण काय?
राज्यपाल पद हे संवैधानिक असून या पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे परंतु भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच वादग्रस्त ठरलेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाचा पाया रचला त्या महाराष्ट्रातच महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून मुलींच्या शिक्षणाबदद्ल असे बोलणे हे खेदजनक तसंच संतापजनक आहे. कोश्यारी यांनी राज्यपालपदाची प्रतिष्ठा त्यांनी धुळीस मिळवली आहे, असेही लोंढे म्हणाले.