मुक्तपीठ टीम
लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान सुरु आहे. नागालँडमधील एका विधानसभा मतदारसंघात नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी या प्रादेशिक पक्षाविरोधात उमेदवारच नसल्याने त्यांच्या उमेदवाराचा बिनविरोध विजय झाला आहे. देशभरात सर्वच मतदारसंघांमध्ये होणाऱ्या लढती या चुरशीच्या असल्याचे दिसत आहे. त्यातही भाजपा विरुद्ध काँग्रेस अशा काही लढती जास्तच रंगतदार आहेत. दादरा नगर हवेलेचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या संशयास्पद आत्महत्येनंतर तिथं होत असलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनाही लढत असल्याने महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
आता मतदान होत असलेल्या हिमाचल प्रदेशातील मंडी, मध्य प्रदेशातील खांडवा, आसाममध्ये पाच, पश्चिम बंगालमध्ये चार, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालयमध्ये प्रत्येकी तीन, बिहार, राजस्थान आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी दोन, तर आंध्रप्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, मिझोराम आणि तेलंगणातील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.
दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह मुंबईतील हॉटेलमध्ये सापडला होता. त्यांनी भाजपा नेत्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी कलाबेन डेलकर या शिवसेनेतर्फे मैदानात उतरल्या आहेत. तेथे भाजपानेही जोर लावला असून लढत चुरशीची झाली आहे. राजद नेते लालूप्रसाद यादव पुन्हा सक्रिय झाल्यामुळे बिहारातील पोटनिवडणुकांमध्ये चुरशीची लढत दिसत आहे. मध्यप्रदेश, राजस्थानात आणि मिझोराम, मेघालय, तेलंगणा वगळता अन्य ठिकाणी भाजपा आणि काँग्रेसमध्येच कडवट मुकाबला दिसत आहे.