मुक्तपीठ टीम
कोवॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHOकडून अद्याप मान्यता नसल्याने ती घेतलेले लसवंत हवालदिल झाले आहेत. WHOची मान्यता नसल्याने अनेक मोठ्या देशांनी ही लस घेतलेल्यांना लसवंत मानण्यासही नकार दिला आहे. कोवॅक्सिनच्या मंजुरीतील अडथळ्यांमुळे ही लस घेतलेल्या लाखो लोकांची झोप उडाली आहे. यामध्ये विशेषतः ज्यांना परदेशात जायचे आहे त्यांचा यात समावेश आहे. काहींनी तर थेट सर्वोच्च न्यायालयात जात दुसऱ्या कंपनीची लस घेण्याची परवानगी मागितली होती. मात्र, न्यायालयाने तसे काही न करता WHOच्या निर्णयाची वाट बघायला सांगितले आहे.
कोव्हॅक्सिन घेतलेल्यांचे जीव टांगणीवर…
- कोवॅक्सिन लस निर्माती कंपनी भारत बायोटेक दीर्घकाळापासून जागतिक आरोग्य संघटनेकडून इमर्जन्सी अॅप्रूवलची वाट पाहत आहे.
- यामुळे लस घेतलेल्यांसाठी आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंधातून सुटका होणार आहे.
- तसेच कोवॅक्सिनच्या निर्यातीचा मार्गही खुला होणार आहे.
- इतर देशांना या लस पुरवठा करण्यासाठी लसीला जागतिक आरोग्य संघटनेची इमर्जेंसी यूज लिस्टिंग (EUL) मान्यता मिळणे आवश्यक आहे.
आतापर्यंत कोणत्या लसींना मान्यता?
- आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेने सहा लसींना EUL दिला आहे.
- यामध्ये Pfizer-BioNtech, SK Bio, Serum Institute of India (SII) – कोविशिल्ड, AstraZeneca EU, Janssen, Moderna आणि Sinopharm या लसींचा समावेश आहे.
अनेक देश लसीकरण झाल्याचेच मानत नाहीत…
- लसीची मान्यता प्रलंबित असल्यामुळे ज्यांना ही लस मिळाली आहे, त्यांना प्रवेश देण्यास युरोपीय देश आणि अमेरिका तयार नाहीत.
- कोवॅक्सिन घेतलेल्या व्यक्तींचे लसीकरणच झाले नाही असे मानले जात आहे. या उलट काही देशांनी भारतीय लसीला आधीच मान्यता दिली आहे.
- यामध्ये मेक्सिको, नेपाळ, फिलिपाइन्स, इराण, मॉरिशस, ओमान या देशांचा समावेश आहे.
मंजूरी मिळाली नाही तर काय होणार?
- भारताने अलीकडेच १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे.
- भारतातील लसीकरण कार्यक्रमात प्रामुख्याने कोवाशिल्ड आणि कोवॅक्सिन याच लसी देण्यात आले आहेत.
- आता जर WHOकडून लसीला मान्यता मिळाली नाही तर खूपच विचित्र परिस्थिती ओढवणार आहे., काही प्रमाणात ती आता ओढवलीही आहे.
- लस घेऊनही त्यांना लसवंत मानले जात नाही आणि दुसरी लस घेता येत नाही!
कोवॅक्सिन घेतलेल्यांपुढील अनेक प्रश्न
- ज्या लोकांना ही लस घेतली आहे त्यांना पुन्हा लस घेण्याची गरज आहे का? आधी केलेले लसीकरण मानले जाणार नाही का?
- कोवॅक्सिनचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही ते परदेशात जाऊ शकणार नाही का?
असे सर्व प्रश्न लस घेतलेल्या लोकांना सतावत आहेत.