मुक्तपीठ टीम
आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये झालेल्या गोंधळाची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली आहे. युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
आरोग्यसेवक परीक्षांमध्ये राज्यसरकारने पुन्हा एकदा घोळ केला आहे.पेपर वेळेवर पोहोचलेच नाहीत,हॉल तिकीट नाही,वर्गात विद्यार्थ्यांचे नंबरच नव्हते,पेपर सिलपॅक नव्हते अश्या अनेकतक्रारी आहेत.सातत्याने तीचचूक करून विद्यार्थ्यांच जगण मुश्कीलकरणाऱ्या राजेश टोपे यांनी त्वरित राजीनामा द्यावा pic.twitter.com/ehAzl03dXz
— Vikrant Balasaheb Patil (@ivikrantpatil) October 24, 2021
या निवेदनात म्हटले आहे की, आरोग्य विभागातील परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. या गोंधळाला जबाबदार असलेल्या न्यास या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे तसेच या कंपनीच्या संचालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी , न्यास ला या परीक्षांचे कंत्राट देण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच अराजपत्रीत पदांच्या परीक्षा यापुढे राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्यात आदी मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
या शिष्टमंडळात युवती विभाग संयोजिका मिना केदार,विद्यार्थी विभाग संयोजक अक्षय पाटील,प्रदेश सचिव सुजित थिटे तसेच एमपीएससी विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता.