मुक्तपीठ टीम
‘रक्तदान सर्वश्रेष्ठ दान’ हे ब्रीद घेऊन पुण्यातील सांस्कृतिक प्रतिष्ठानने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत १०५० रक्तदात्यांची अद्ययावत रक्तसुची तयार केली आहे. दत्तवाडी, राजेंद्रनगर, नवी पेठ, सेनादत्त पेठ भागातील सोसायट्यांमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून हे सर्वेक्षण सुरु आहे. पाच हजार घरांचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला असून, त्यातून एकूण १६,३०० लोकांशी संपर्क केला. त्यातील १०५० लोकांनी रक्तदान करण्याची तयारी दर्शवत आपली माहिती संस्थेला दिली. त्यामध्ये ३५० महिलांचा सहभाग आहे. दुर्मिळ रक्तगटाचे लोकही यामध्ये आहेत. त्याचा उपयोग आपत्कालीन परिस्थितीत होऊ शकते.
यामध्ये रक्तदात्याचे नाव, रक्तगट, जन्मतारीख व त्याचा मोबाईल नंबर अशी माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात कोणाला आपत्कालीन स्थितीत रक्ताची आवश्यकता पडली, तर तातडीने रक्तदाता उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष ओंकार माळवदकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हे सर्वेक्षण केले आहे. रक्तसुची बनविण्याचे काम गेल्या २१ वर्षांपासून ओंकार यांचे वडील सुरेश (अप्पा) माळवदकर करत होते.
ओंकार माळवदकर म्हणाले, “माझे वडील अप्पा माळवदकर यांनी घरोघरी पायी फिरून २१ वर्षांपासून हा उपक्रम राबवला. त्यांच्या निधनानंतर प्रतिष्ठानचे काम पाहायला सुरु केले आणि त्यांचा हा उपक्रम पुढे घेऊन जात आहे. एकूण वीस हजार घरांचे सर्वेक्
षण करून जास्तीतजास्त लोकांना रक्तदानाच्या या मोहिमेत सहभागी करून घ्यायचा प्रयत्न आहे. संपूर्ण सर्वेक्षण झाल्यावर आमच्याकडे किमान पाच हजार रक्तदात्यांची सूची असेल.”
“रक्ताचे नाते जोडण्यासाठी सर्वेक्षणातील सर्वच व्यक्तींना खास वाढदिवसाची शुभेच्छा पत्रे पाठवण्याची परंपरा अप्पांनी सुरु केली होती. मोबाईल-इंटरनेटच्या जमान्यातही पोस्टकार्ड पाठवून शुभेच्छा दिल्याने अनेक लोक रक्तदानाच्या या मोहिमेत सहभागी होतात. या उपक्रमामुळे आजवर अनेकांचे जीव वाचले असून, रक्तदान यासारख्या पवित्र कार्यात योगदान देऊ शकत असल्याचे आणि वडिलांची परंपरा पुढे नेत असल्याचे समाधान आहे,” असे ओंकार माळवदकर यांनी नमूद केले.