मुक्तपीठ टीम
गेले काही महिने सातत्यानं भाजपा नेते आणि त्यांच्या आरोपांचे प्रोमो चालल्यानंतर ईडी, आयटी चौकशीचे लक्ष्य ठरणाऱ्या राष्ट्र्वादी काँग्रेसच्या नेते आता अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. आतापर्यंत राज्याचे कौशल्य विकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक आक्रमकपणे एनसीबीवर तुटून पडत होते. आता मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारही आक्रमक झाल्याचे दिसत आहे. सातारच्या जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी व्यवहाराबद्दल पवार कुटुंबीयांना लक्ष्य केले जाणे अजित पवारांच्या मनाला लागल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्यांनी राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यांच्या खरेदी-विक्री व्यवहाराबद्दल महत्वाची माहिती उघड करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आज ते नेमका काय गौप्यस्फोट करतात त्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
अजित पवारांचा किरीट सोमय्यांना टोला
सातत्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष्य करणारे भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनाही त्यांनी हल्ला चढवला. ते म्हणाले, “काही जण एवढी कागदपत्रे दाखवतात… अमुक तमुक… चौकशी करण्याचा अधिकार ज्या एजन्सीला आहे ती एजन्सी चौकशी करेल की नाही की दुसरं कुणी करेल असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता किरीट सोमय्या यांना लगावला.
पत्रकारांनी किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला असल्याचा प्रश्न विचारला असता जर कुणी भ्रष्टाचार केला असेल तर तो पुढे येईल किंवा केलेला नसेल तर तेही पुढे येईल. आरोप करणं हे विरोधी पक्षाचे काम आहे. त्याचपध्दतीने ते आरोप करत आहेत.
त्यांनी केलेल्या आरोपात पुरावा बघितला जाईल. नुसता बिनबुडाच्या आरोपाला अर्थ नसतो. याप्रकरणात अनेकांनी पूर्वीच्या सरकारमध्ये असताना चौकशी केलेली आहे. सीआयडी, एसीबी, एडब्लूओ यांनीही चौकशी केली आहे. सहकार विभागाने एका न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी केलीय. यामध्ये एक – दोन कारखाने चालवायला दिले किंवा विकले गेलेले नाहीत तर त्याचा जवळपास आकडा ६०-७० पर्यत असू शकतो आणि त्यात सर्वच राजकीय पक्षाशी संबंधित उद्योगपती, बिल्डर आहेत असेही अजित पवार म्हणाले.
राज्यातील साखर कारखाने घेण्यात अनेक राजकारणी, बिल्डरही!
- अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना राज्यात झालेल्या सर्वच साखर कारखान्यांचे व्यवहार उघड करणार असल्याची माहिती दिली.
- फक्त जरंडेश्वर हा एकच साखर कारखाना विकत गेला असं नाही.
- राज्यात ७५ पर्यंत साखर कारखाने विकले गेलेत.
- यसाखर कारखान्यांपैकी काही शेतकऱ्यांनीही घेतले. पण काही साखर कारखाने बिल्डरांनी, काही राजकीय पक्षांशी संबंधित व्यक्तींनीही घेतले.